पिंपरी चिंचवडच्या मुली हुशार!!
शहराचा बारावीचा निकाल 96.55 टक्के

मुलींचा निकाल 97. 77 टक्के तर मुलांचा निकाल 95.47
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी चा निकाल सोमवारी (दि. 5) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहराचा निकाल 96.55 टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलांचा 95.47 टक्के तर मुलींचा 97.77 टक्के निकला लागला. गेल्या वर्षी 94.64 टक्के निकाल लागला होता. यंदा निकालामध्ये वाढ झाली आहे.
शहरामध्ये बारावीच्या एकूण 18 हजार 803 विद्यार्थ्यानी अर्ज भरले होते. यामध्ये 9 हजार 979 मुले आणि 8 हजार 824 मुली होत्या. यापैकी 9 हजार 933 मुले आणि 8 हजार 792 मुलींनी परीक्षा दिली. यापैकी 18 हजार 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 9 हजार 484 मुले आणि 8 हजार 596 मुली उत्तीर्ण झाल्या.
हेही वाचा : पुणे-जोधपूर एक्सप्रेसचा चिंचवड रेल्वे स्थानकावर दैनंदिन थांबा!
मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांनी निकाल ऑनलाइन पाहिला. निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी जमली. निकालाची प्रत महाविद्यालयांमध्ये उद्यापासून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मावळ तालुक्याचा निकाल 95.10 टक्के
मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 95.10 टक्के लागला. यावर्षी मावळ तालुक्यातील एकूण 3 हजार 910 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी 1913 मुले आणि 1990 मुली होत्या. मुलांचा निकाल 92.94 तर मुलींचा निकाल 97.18 टक्के लागला आहे.