शिवसेना उबाठाचे सर्व खासदार मातोश्रीवर; कोणी कुठेही जाणार नसल्याचा केला दावा

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात असेही दावे करण्यात आले. परंतु शनिवारी मातोश्रीवर पक्षाची बैठक बोलावण्यात आली तेव्हा सर्व खासदार त्यात उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कोणाताही खासदार कोणत्या पक्षात जात नसल्याचे बैठकीनंतर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर, पक्ष पुन्हा एकदा बळ एकवटण्याचा प्रयत्न करत आहे. यावर्षी महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होणार असल्याने, उद्धव यांच्या विविध पातळीवरील नेत्यांसोबतच्या बैठका सुरू आहेत. खासदारांसोबत झालेल्या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याचे मानले जाते. एक दिवस आधी मातोश्री येथे मॅरेथॉन बैठकही झाली. उद्धव ठाकरे यांनी तीन टप्प्यांत सलग पाच तास आमदारांशी महापालिका निवडणुका आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली.
संजय दिना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचे अधिवेशन सुरू होणार आहे. आमच्या पक्षाकडून कोणते मुद्दे असतील, आम्ही अधिवेशनात कोणते प्रश्न उपस्थित करणार आहोत, या सर्व मुद्द्यांवर उद्धवजींशी चर्चा झाली आहे. आमचे खासदार दुसऱ्या पक्षात जाण्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. या सर्व पसरवल्या जाणाऱ्या अफवा आहेत. आदित्य ठाकरे दिल्लीत पोहोचले होते आणि त्यांनी या विषयावर आमच्याशी चर्चा केली होती, पण असे काहीही झालेले नाही.
शिंदे गटातून कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. दिल्लीतील एका घरगुती कार्यक्रमादरम्यान शिंदे गटाच्या नेत्यांसोबत बैठक झाली आणि त्याबद्दल अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. जर मला शिंदे गटाच्या कोणत्याही नेत्याचा फोन आला तर मी त्यांना नक्कीच भेटायला जाईन असेही पाटील म्हणाले.