Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘बेळंकी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला दर्जेदार आरोग्यसेवेचे नवे केंद्र’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

सांगली : मिरज तालुक्यातील बेळंकी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या आहेत. या रुग्णालयात लवकरच डायलिसिस सुविधा सुरू करण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज दिली.

बेळंकी येथे उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे, कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जयश्री पाटील, सुमन खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे आदि उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की, नागरिकांना त्यांच्या निवासस्थानापासून पाच किलोमीटरच्या परिसरात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी शासन विविध स्तरांवर कार्यरत असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावोगावी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यात आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासह त्यांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  भारत केवळ बाजारपेठ नाही, तर जागतिक विकासाचा ‘लाँचपॅड’; न्यूझीलंडमध्ये PM मोदींची गुंतवणूकदारांना साद

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या ग्रामीण रुग्णालयामुळे बेळंकीसह परिसरातील सुमारे 30 ते 35 गावांतील नागरिकांना मोठी आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. आपत्कालिन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळाल्याने अनेक रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होईल. बेळंकी गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून तो मंजूर व्हावा, तसेच रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

जयश्री पाटील यांनी या रुग्णालयामुळे ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून हे रुग्णालय परिसरासाठी वरदान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फीत कापून रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून उपलब्ध सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीची माहिती देत उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील आरोग्य सेवांबाबत सविस्तर विवेचन केले. सूत्रसंचालन सयाजी शिंदे यांनी केले, तर आभार संताजीराव गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका पदाधिकारी, सदस्य, विविध गावचे सरपंच, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, बेळंकी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमारे एक एकर जागेवर 46 हजार चौरस फूट क्षेत्रफळात सुमारे 15 कोटी 58 लाख रुपये खर्चून बेळंकी ग्रामीण रुग्णालयाची तीन मजली अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली आहे. या रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण 27 पदे मंजूर असून त्यापैकी 23 पदे भरलेली आहेत. यापूर्वी बेळंकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र स्वतंत्र इमारत नसल्यामुळे सेवा जुन्याच इमारतीत देण्यात येत होती. आता स्वतंत्र व सुसज्ज इमारतीमुळे नागरिकांना अधिक सक्षम आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळणार आहे.

रुग्णालयाच्या तीन मजली इमारतीमध्ये बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), एक्स-रे विभाग, डार्करूम, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, रक्तसाठा कक्ष, वैद्यकीय स्टोअर, डॉक्टर कक्ष, प्रसूती कक्ष, नवजात शिशू विभाग, बालरोग विभाग, महिला व पुरुष वॉर्ड, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, निर्जंतुकीकरण कक्ष, पे-वॉर्ड, अतिरिक्त वॉर्ड, रुग्ण प्रतीक्षा कक्ष, नोंदवही कक्ष यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button