Budget Session 2025 : उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; विरोधक ‘या’ मुद्यांवर सरकाराला घेराव घालण्याची शक्यता

मुंबई : उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनाकडे अवघ्या महराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कोणत्या नव्या योजनांची घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच मध्यमवर्गांना दिलासा मिळणार का, शेतकरी वर्गांसाठी काय करणार, तरुणांसाठी कोणत्या योजना राबणार, उद्योगांसाठी कोणते निर्णय घेणार असे एक ना अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहेत. या सर्व प्रश्नांवर सरकार काय करणार याचे उत्तर १० मार्चला मिळणार आहे.
१० मार्च या दिवशी राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे २०२५-२६ चा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करणार आहेत. पण त्या अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुंद्यावर घेरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सत्ताधारी त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखत असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात सद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. बदलापूर येथील अत्याचार प्रकरण, नुकतीच स्वारगेट स्थानकातील बलात्कार प्रकरण, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडच्या नावावर शिक्का मोर्तेब या मुद्यांवर विरोधक आक्रमक होऊ शकतात.
हेही वाचा – तंत्रज्ञान हाच विकासाचा आधारस्तंभ; फिनटेक’, ‘एआय’ला प्राधान्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
तसेच देशमुख हत्या प्रकणातील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचे नाव आले आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरू शकतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचेच दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अल्प उपत्न दाखवून मिळवलेली सदनिका प्रकरण या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करू शकतात. तसेच वाढती गुन्हेगारी, दरवाढ, तरुणांसाठी नोकऱ्या आदी मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्याच्या तयारीत विरोधक आहेत. यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार असल्याचे बोलेले जात आहे.
शेतकरी कर्जमाफी सोयाबीन आणि कापूस दरवाढ सोयाबीन आणि कापूस खरेदीबाबात काही ठोस निर्णय सरकार घेणार का हे पाहवे लागणार आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेत सरकार वाढ करणार का हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे. यासारख्या मुद्यांवर सरकार काही घोषणा करणार का याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.