आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

पुणे | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्याला १५ ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि हणगं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य, असं संभाजी भिडे म्हणाले. ते संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन होताना त्या धारकऱ्यांसह या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते. आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संभाजी भिडे म्हणाले, आपल्याला १५ ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि हणगं स्वातंत्र्य आहे. ते जमत नाही. स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य. भगवा झेंडा घेऊन आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे. जिथे जिथे सूर्य उगवतो तिथे तिथे भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे.
हेही वाचा – लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले! शोधकार्य सुरू
वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपल्याला रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापन करायचं आहे. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाट्टेल ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या व्रताची पथ्यं आहेत. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, अशा १०-१० हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. तसंच प्रत्येक तालुक्यात आपल्याला १० हजार तरुणांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेले लोक आपल्याला तयार करायचे आहेत, असंही संभाजी भिडे म्हणाले.
संभाजी भिडेंना नोटीस
संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांबरोबर धारकरी पालखीत सहभागी होतात. याआधी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी शिवप्रतिष्ठान अध्यक्ष संभाजी भिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध नसले, तरी त्यांना पुणे पोलिसांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस दिली आहे. पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, अशी सूचना भिडे यांना देण्यात आली.




