breaking-newsमनोरंजन

#MovieReview: घर आणि नात्यांचा गोडवा ‘होम स्वीट होम’

घर म्हटलं की अनेक गोष्टी असतात, पण हे त्या घराला घरपण हे त्यातील निर्जीव वस्तूंमुळे नाही तर कुटुंबातील मायेच्या ओलाव्यामुळे येते. लेखक, अभिनेते अशी ओळख असलेल्या हृषीकेश जोशी यांनी दिग्दर्शनात पदार्पण करतान ‘होम स्वीट होम’या मराठी चित्रपटातून घर हाच विषय निवडत अतिशय हटके अंदाजात त्याचे सादरीकरण केले आहे. गेल्या वर्षी निधन झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचा हा अखेरचा चित्रपट आहे.

‘होम स्वीट होम’ या चित्रपटाची कथा मुंबईतील एका मध्यवर्गीय मूलबाळ नसलेल्या आणि उतारवयाकडे झुकलेल्या दाम्पत्याभोवती गुंफण्यात आली आहे. श्यामल (रीमा) आणि विद्याधर महाजन (मोहन जोशी) यांची ही कथा आहे. साठी पार केलेलं हे मुंबईतील एका मध्यवर्ती भागात असलेल्या  जुन्या इमारतीतील घरात मागील ३५ वर्षांपासून राहत असतात. अनावधाने एक व्यक्ती त्यांच्या घरात घुसते आणि त्यांचे घर विकत घेण्याची तयारी दाखवते, त्यावेळी त्यांना समजते की आपल्या घराची किंमत सुमारे साडेतीन कोटी आहे. यामुळे श्यामल यांना आपण हे घर विकून सर्वासुखसोई असलेल्या टॉवर मध्ये घर घ्यावे असे वाटते. कारण त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, इथे लिफ्ट नाही यामुळे चार माजले चढून जाणे त्यांना जमत नाही, तर आठवणींचा खजीना असलेल्या या जुन्या इमारतीतच राहणं विद्याधरमहाजन यांना पसंत आहे. दरम्यान त्यांच्या ओळखीचा सोपान (हृषिकेश जोशी) हा घरांच्याच डील करून देणारा एजंट आहे, मग श्यामल त्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखवतात. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ‘होम स्वीट होम’  चित्रपट बघायला हवा.

दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांनी ‘होम स्वीट होम’ त्यांच्या या पहिल्या कलाकृतीमधून आपली वेगळी चाप सोडली आहे. घर आणि त्यातील कुटुंबाच्या जीवनातील अनेक कंगोरे चित्रपटात अतिशय समर्पकपणे सादर केले आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मनात असणारे राहत्या घराचे स्थान अतिशय संवेदनशीलपणे मांडले आहे. घर हे केवळ चार भिंतींमुळे उभे राहत नाही, त्यासाठी लागतो कौटुंबिक जिव्हाळा. राहत्या घरातून नवीन घरात जाताना होणारी भावनिक घालमेल योग्य शब्दात रेखाटली आहे. हृषीकेश जोशी आणि वैभव जोशी यांच्या पटकथेचा वेग कुठेही मंदावत नाही, मुग्धा गोडबोले यांचे संवाद चित्रपटात रंगत आणतात. वैभव जोशी यांच्या कविता कथेला एका वेगळ्या उंचीवर घेउन जातात.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांच्यातील केमिस्ट्री जबरदस्त रंगली आहे. स्पृहा जोशी,विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी यांनी आपल्या भूमिका उत्तम साकारत चित्रपटात रंगत आणली आहे, तसेच काही पाहुणे कलाकार छोट्या – छोट्या भूमिकाही चित्रपटाला अधिक संपन्न बनवतात.

नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांचे संगीत मनाला भावणारे आहे. एकंदरीत सांगायचे तर नात्यांच्या रीडेव्हलपमेंटवर अतिशय खुमासदार शैलीत भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ एकदा बघायला काहीच हरकत नाही.

चित्रपट – होम स्वीट होम

निर्मिती – फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि.

प्रस्तुती – प्रोऍक्टिव्ह

दिग्दर्शक – हृषीकेश जोशी

संगीत – नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर

कलाकार – रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख

रेटिंग – ***

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button