अबब…राम मंदिरासाठी तब्बल 1 कोटी रुपये आले, कुणी पाठवले हेच माहिती नाही, त्यावर नाव शिवसेना: राम मंदिर ट्रस्ट
अयोध्या: राम मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातूनही मदतीचा ओघ सुरु आहे. त्यातच आता स्वतः राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी महाराष्ट्रातून तब्बल 1 कोटी रुपये आल्याचं सांगितलेलं आहे. तसेच हे एक कोटी रुपये कुणी दिले हे माहिती नाही, मात्र, त्यावर शिवसेना असं लिहिलेलं असल्याचंही चंपतराय यांनी नमूद केलेलं आहे. ते राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंपतराय म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 3 कोटी रुपयांची घोषणा केलेली होती. नुकतेच राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटी रुपये आलेले आहेत. हे पैसे नक्की कुणी पाठवले हे माहितीच नाही. मात्र, जी पोहच आली आहे त्यावर शिवसेना असे लिहिलेले आहे.” दरम्यान, याआधी राम मंदिर ट्रस्ट निर्मितीचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी शिवसेनेने राम मंदिरासाठी एकही रुपया दिला नसल्याचा दावा केलेला होता. ते म्हणाले होते, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केलेली होती. मात्र यातील एकही रुपया अद्याप ट्रस्टला मिळालेला नाही. हे एक कोटी नेमके कुठे गेले असा प्रश्न उपस्थितीत होत आहेत.”