ठाकरे बंधू एकत्र येणार? मंत्री नितेश राणेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सोलापूर : राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांनी अनेकदा अपमान केला आहे. यासाठी एक वेगळे पुस्तकच बनेल. निष्ठावंत मनसैनिक आज पूर्णपणे अस्वस्थ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार खऱ्या अर्थाने राज ठाकरे हेच होते. तसा त्यांना पूर्णपणे हक्क असताना त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. राज ठाकरे सुज्ञ आहेत. कोणाचे भांडण मिटत असतील आणि कोणाचे कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही आनंदी आहोत. मात्र झालेला अपमान राज ठाकरे विसरलेले नसतील, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगाविला.
सोलापुरात उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीच्या चर्चेवर बोलताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात कडवट हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुर्चीवर बसलेले आहेत. व्यवसायाच्या नावाखाली सोलापुरातील हिंदू कुटुंबीयांना अन्य लोकांकडून त्रास देण्यात आला. हिंदू समाजानेच आशीर्वाद देऊन आपणास सरकारमध्ये बसवलेले आहे. त्यामुळे हिंदूंनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही. देवा भाऊंचे सरकार सोलापुरातील हिंदू बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.असा विश्वास देण्यासाठी आपण सोलापुरात आलो आहोत, असेही राणे म्हणाले.
हेही वाचा – राज्यातील 903 योजनांची मान्यता रद्द; देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
सेक्युलर हा काँग्रेसने जन्म घातलेला शब्द आहे. हिंदु राष्ट्रात हिंदुत्ववादी विचारच आपणास पुढे घेऊन जात असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते भाजप आणि शिवसेनेत येत असल्याचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिंदे सेनेतील पक्षप्रवेशाच्या प्रश्नाला उत्तर देताना नितेश राणे यांनी सांगितले. ठाकरेसेनेतील पाच खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले, ऑपरेशन टायगर, लायन आणि कोल्हा याबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर दौऱ्यात आल्यानंतर विचारा असे ते म्हणाले.