चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग : स्टेशनमध्ये धुराचे लोट

मुंबई : मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील एका केकच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनित अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे.
आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीमुळे चर्चगेट रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. ज्यामुळे स्थानकातील सबवे बंद करण्यात आला. तसेच आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामी करण्यात आला. तसेच, प्रवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग लागल्याच्या सुरुवातीला स्थानकात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता, ज्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तातडीने पश्चिम रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पोलीस यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित होती आणि त्यांनी गर्दीचे व्यवस्थापन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.
हेही वाचा – ठाकरे बंधू एकत्र येणार? मंत्री नितेश राणेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
या घटनेमुळे काही काळासाठी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर थोडा परिणाम झाला होता, परंतु आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तात्काळ उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना टळली.
चर्चगेट रेल्वे स्थानकातील दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आले आहे. यावेळी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात धूर आला. त्यानंतर आग लागली. या घटनेनंतर तात्काळ पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांनी दिली.