राज्यात थंडी वाढणार? तापमान पुन्हा एक अंकी…

Maharashtra Weather Update: नव्या वर्षाच्या सुरुवातीला किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली होती. मात्र, आता तापमानात तीन ते चार अंश सेल्सियसने घट झाली असून, पुन्हा एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
उत्तरेकडून येणारे थंड वारे, निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान अशा कारणांमुळे यंदा डिसेंबरचा जवळपास पूर्ण महिनाभार थंडी अनुभवायला मिळाली. पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी एक अंकी तापमान अनेकदा नोंदवले गेले. त्यामुळे राज्यभरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. नव्या वर्षातही थंडी कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र, हवामान बदलांमुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली होती. पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. पुण्यातील शिवाजीनगर आणि जिल्ह्यातील काही भागांतील तापमान १४ अंश सेेल्सियसपेक्षा अधिक होते. या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन दिवसांत हवापालक होऊन शहरात पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी शिवाजीनगर येथे ९.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तसेच एनडीए येथे नीचांकी ७.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर हवेली येथे ८.२, पाषाण येथे ९.३, बारामती येथे ९.८ दौंड येथे १० अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.
हेही वाचा – ‘आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, पुढील दोन दिवस राज्यात किमान तापमान एक अंकी होण्याची शक्यता आहे. मात्र थंडीच्या लाटेची शक्यता नाही. मध्य भारतात प्रतिच्रकवात स्थिती सक्रिय असल्याने उत्तरेकडील वारे ईशान्य विदर्भामार्गे राज्यात येत आहेत. त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होत आहे. मात्र, किमान तापमानातील सरासरीपासूनची तफावत उणे ४.५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे थंडीच्या लाटेची शक्यता जाणवत नाही.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली. तर जळगाव येथे ११.३, कोल्हापूर येथे १४.८, मालेगाव येथे १२, नाशिक, गोंदिया येथे १०, यवतमाळ येथे ११, वर्धा येथे ११.५, नागपूर येथे १०.६, अकोला येथे १४.५, अमरावती येथे ११.६, परभणी, धाराशिव येथे १०.६, बीड येथे १२.५, मुंबई येथे २०.५, रत्नागिरी येथे १९.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.




