पुणे पोलिसांचा इशारा! गाडीचा वेग वाढला, पण आता ‘या’ चुका केल्या तर ६ महिने वाहन होणार जप्त

पुणे : शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग १९ किमी प्रतितासावरून २२ किमी प्रतितासापर्यंत वाढवण्यात यश आले आहे. मात्र, वेग वाढताना अपघात वाढता कामा नये, असे स्पष्ट प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील काळात पुणे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग २६ किमी प्रतितासापर्यंत नेण्याचा प्रयत्न राहील,
अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणांची ओळख पटवून तेथे विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.वेग वाढवणे आणि अपघात कमी करणे, ही दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करणार आहोत, असे आयुक्तांनी ठामपणे नमूद केले.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी सुमारे ६०० प्रकरणे नोंदली जात होती, मात्र, आता ही संख्या ७,५०० पर्यंत पोहोचली आहे. दारू पिऊन वाहन चालवाल तर कारवाई अटळ आहे, असा इशारा त्यांनी दिला. अशा चालकांवर दंडात्मक कारवाईसह सार्वजनिक स्वरूपात सत्कार केला जाईल, असेही त्यांनी उपरोधिक शब्दांत सांगितले.
हेही वाचा – ‘आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
ट्रिपल सीटने दुचाकी चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून, नियमभंग करणाऱ्यांची वाहने तब्बल सहा महिन्यांसाठी जप्त केली जाणार आहेत. रस्त्यावर हिरोगिरी करणाऱ्यांना आता दणका देण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर पोलिसांना शिवीगाळ करणारे, निगेटिव्हिटी पसरवणारे किंवा कायद्याचे उल्लंघन करणारे रिल्स तयार करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई केली जाणार आहे.
फॅशन फूड ठीक आहे; पण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणारच, असे आयुक्तांनी ठामपणे सांगितले. गुन्हेगारीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणाऱ्यांनाही माफ केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मुद्देमाल वितरणही करण्यात आले. सडक सुरक्षा-जीवनरक्षा हा संदेश देत, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.




