मुंबईत दोन वाघांच्या डरकाळ्या… मेळाव्यातून ठाकरे आणि शिंदेंची तोफ धडाडणार

मुंबई : शिवसेनेचा आज ( 19 जून) 59 वा वर्धापनदिन असून याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट, दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा आज षणमुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. आजच्या 59 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून षण्मुखानंद हॉल परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. ’मुंबईत ठाकरेच’ अशा आशय़ाचे भलेमोठे बॅनर या परिसरात लावण्यात आले असून त्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटोही झळकत आहे. सध्या याच बॅनरची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
तर शिवसेना शिंदे गटही आजच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी सज्ज झाला असून तो वरळीत साजरा केला जाणार आहे. याच व्रादपन दिनाच्या पार्श्वभूमीवर काल, एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी’, असे म्हणत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे , असा पोटो कालपासूनच सोशल मीडियावर फिरतोय. शिंदे गटातर्फे वरळीतील एनएससीआय डोम येथे वर्धापन दिनाचा सोहळा पार पडणार आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटा यांचे दोन सोहळे होणार असून, त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे काय भाषण करतात, काय बोलतात याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, खासदार, तसेच राज्यभरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख मुंबईतील विभाग प्रमुख शाखाप्रमुख पदाधिकारी हे आजच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असतीस. षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम होत असल्याने आणि मोठी गर्दी होणार असल्याने मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार आसन व्यवस्था असणार आहे, नेते उपनेते आमदार खासदार यांच्यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली आहे. बाळासाहेब असताना देखील आणि आताही अनेकवेळा शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद सभागृहातच साजरा केला जातो.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये होईल.
हेही वाचा – व्ही. के. माटे हायस्कूल व श्रीमती पार्वतीबाई प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव जल्लोषात
दरम्यान वर्धापन दिनानिमित्त बनवलेल्या ” प्रवास आपल्या शिवसेनेचा” हा व्हिडिओ आजच्या कार्यक्रमात दाखवला जाणार आहे. शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून विविध महत्वाचे शिवसेनेचे टप्पे या निमित्त व्हिडिओ द्वारे मांडले जाणार आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी मुंबई महानगर पालिकेच्या दृष्टीने मुंबईतील ठराविक नेत्यांची भाषणं होणार असून त्यानंतर संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांचीही भाषणं होतील. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.
ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा हा निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा असेल असे बोलले जात आहे. एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा सुरु असताना आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे प्रचाराचा नारळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज फोडला जाणार आहे.
माजी नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेवकांच युतीसंदर्भात मत जाणून घेतल्यानंतर मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून युती संदर्भात उद्धव ठाकरे नेमकं काय भाष्य करणार? याकडे सर्वांच लक्ष असेल. शिवसेना मनसेच्या युतीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू असून त्याच युतीबद्दल वर्धापन दिनी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसमोर नेमकं काय बोलणार? हे पाहणंही महत्वाचं ठरेल. तसेच हिंदुत्व, मराठीचा मुद्दा, मुंबईतील प्रश्न, राजकीय परिस्थिती, राज्यातील प्रश्न यावर उद्धव ठाकरे हे आजच्या मेळाव्यात काय भाष्य करतात ? तसेच आगामी महापालिकांनी निवडणुकीला ठाकरेंचा शिवसेना पक्ष कशाप्रकारे सामोरा जाणार?, याची दिशा उद्धव ठाकरे आपल्या भाषणात दाखवण्याची शक्यता आहे.
ठाण्यातही शिवसेनेत्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. भगवा शिवरायांचा.. बाळासाहेबांचा महाराष्ट्राचा शिवसैनिकांचा.. असा मजकूर बॅनरवर आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देताना फोटो बॅनर झळकताना पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हा बॅनर लावण्यात आला आहे.