व्ही. के. माटे हायस्कूल व श्रीमती पार्वतीबाई प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव जल्लोषात
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी आणि भेटवस्तूंनी भरलेला आनंदाचा पहिला दिवस

पिंपरी-चिंचवड : राज्यातील सर्व शाळांसोबतच मोरया शिक्षण संस्थेच्या व्ही. के. माटे हायस्कूल व श्रीमती पार्वतीबाई प्राथमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा प्रवेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलं व भेटवस्तू देऊन भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सौ. उमाताई खापरे आणि संस्थेच्या कार्यवाह तसेच प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील तात्यासाहेब शेवाळे यांची जागतिक विमा परिषदेसाठी निवड

खासदार उमाताई खापरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शुभेच्छा देत, अभ्यासासोबतच कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातही सहभागी होण्याचे आणि शिस्त व संस्कृती जपण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. पालकवर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नेटके आणि प्रेरणादायी होते. यावेळी उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे यांच्यासह संपूर्ण शाळा परिवाराने प्रवेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित केला.




