Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे’; मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील विविध खेळाडूंनी पदके मिळविली असून त्यांचे स्मरण करुन, आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी कामगिरी करावी; खेळाडू, संघटनांना येणाऱ्या अडअडचणी सोडविण्यासोबतच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक दिनानिमित्त सर परशुराम महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली- उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जाेशी, सुहास पाटील, विभागीय उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महासचिव नामदेव शिरगावकर, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे आदी उपस्थित होते.

जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा देत मंत्री भरणे म्हणाले, स्व. खाशाबा जाधव यांनी 1952 च्या ऑलम्पिक स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर 2024 मध्ये स्वप्नील कुसळे यांनी दुसरे तर पॅरॉलिम्पिक स्पर्धेत सचिन खिलारी यांनी पदक मिळवले. राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळावे, त्याचे मनोधैर्य वाढावे, खेळात सातत्य टिकून राहण्याकरीता नोकरीत 5 टक्के आरक्षण, शासकीय सेवेत थेट नियुक्ती आदी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. सन 2024-2025 मध्ये 149 खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे. बालेवाडी येथे ऑलम्पिक भवन उभारण्यात येत असून त्यामधून खेळाडूंना विविध सुविधा मिळणार आहे.

प्रत्येक गाव, शहरातून अधिकाधिक ऑलिम्पिकवीर घडविण्याकरीता संकल्प करुया, येत्या सन 2028 आणि सन 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशातील खेळाडूंनी अधिकाधिक पदके प्राप्त करावीत, त्यामध्ये राज्याचा सर्वात मोठा वाटा असावा, अशी अपेक्षा मंत्री भरणे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर! 45 वर्षांपैकी फक्त 8 वर्षे नफा

क्रीडा व युवक सेवा आयुक्त तेली म्हणाल्या, महाराष्ट्र हे समृद्ध राज्य असून यामध्ये अतिशय गुणवंत खेळाडू आहेत. तथापि, क्रीडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत राज्याची अपेक्षित कामगिरी झालेली दिसून येत नाही. येत्या काळात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंनी दर्जेदार खेळ खेळत राज्याच्या सन्मानाला साजेशी कामगिरी करावी. क्रीडा विभागाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र 2047 : महाराष्ट्राचे व्हिजन डाक्युमेंट’ तयार करण्यात येत असून नागरिकांनी क्रीड व युवक संचालनालयाच्या संकेतस्थळावर सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले.  क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेवून त्यांना प्रशिक्षण, खेळाडूंना आर्थिक पाठबळ, पुरस्कार, शिष्यवृती देण्यासोबतच खेळाडूंकरीता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन, तालुका, जिल्हा, विभागीय क्रीडा संकुलांचे बांधकाम करण्यात येत असून पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला आहे. खेळाडूंची कामगिरी उज्जवल करण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे, असेही आयुक्त तेली म्हणाल्या.

महासचिव शिरगावकर म्हणाले, राज्यातील ऑलिम्पिक चळवळ देशातील सर्वात मोठी चळवळ असून या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानावर आणण्याचे काम राज्य क्रीडा संघटना करीत आहे. खेळाडूंच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शिबाराचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता खेळाडू, संघटनांना पायाभूत क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे महासचिव शिरगावकर म्हणाले.

याप्रसंगी ऑलिम्पियन बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, हॉकीपटू रेखा भिडे, तसेच अर्जून पुरस्कारार्थी खो-खो खेळाडू श्रीरंग इनामदार, कबड्डीपटू शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारार्थी रोईंगपटू स्मिता यादव-शिरोळे, बॅडमिंटनपटू प्रंदीप गंधे तसेच तिरंदाज गाथा खडके, कुस्तीपटू गायत्री शिंदे, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांचा सत्कार करण्यात आला.  गणेशवंदना, मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग, मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे खेळाडूंनी सादरीकरण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वी लाल महाल ते सर परशुराम महाविद्यालय दरम्यान ऑलम्पिक दौड आयोजित करण्यात आली. यात खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, नागरिकांनी सहभाग घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button