शरद पवार यांनी भाकरी फिरवली; प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत भाजपचे महसूलमंत्री बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली असून खांदापालट केलं आहे. अशातच राष्ट्रवादीतील या नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. प्रत्येक पक्षात वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना निर्णय घेते, तेव्हा प्रदेशाध्यक्ष बदलत असतात. भाजपमध्ये रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले, पूर्वी मी होतो, हा एक प्रक्रियेचा भाग आहे. जयंतराव खूप दिवसापासून तिथे प्रदेशाध्यक्ष होते, आता हा बदल हा त्यांच्या पक्षाच्या प्रक्रियेचा भाग आहे. अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली. ते नागपूर येथे बोलत होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आले आहे. ही भारतीयांचे, शिवप्रेमींचे आनंद द्विगुणीत करणारी बाब आहे. आम्ही महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. असेही महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – MSCB घोटाळ्यात ED चं आरोपपत्र; रोहित पवारांची मात्र ठाम भूमिका, ‘फितुरीला थारा नाही…’
जनतेची आणि समाजाची मालमत्ता नष्ट करणारे माओवादी असतात आणि या माओवाद्यांना साथ देणारे, त्यांना फंडिंग करणाऱ्या संघटना शहरी भागात कार्यरत असतात. अनेक वेळेला विद्यापीठात राहून नवीन पिढीला माओवादी विचारांकडे वळवतात, कडव्या डाव्या विचारसरणीचा बिजारोपण करतात. जेव्हा बंदुकीतून लढता येत नाही तेव्हा ते असा भ्रम निर्माण करतात. त्यांना संविधान, लोकशाही, न्यायालय मान्य नाही आणि या व्यवस्थे विरोधात समाजामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या या संघटना आहेत. या संघटनांना जेरबंद करण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा महाराष्ट्रमध्ये आणण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक मताने मान्यता मिळाली. महाराष्ट्रातील शहरांमध्ये काम करणाऱ्या फ्रंटल ऑर्गनायझेशनला आळा बसवण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून करता येईल. अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या जनसुरक्षा विधेयक कायद्याला विरोध केला असला तरी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सर्व काही स्पष्ट केले आहे. मी जनसुरक्षा विधेयकाच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होतो. 12000 मतं आम्ही घेतले, पब्लिक डोमेनमध्ये कायद्याचा ड्राफ्ट टाकण्यात आला होता. उद्धव ठाकरेंनी कधीतरी राज्याच्या हिताचा बोललं पाहिजे, युवा पिढीची काळजी घेतली पाहिजे. संयुक्त समितीच्या पाच बैठका झाल्या, त्यामध्ये अंबादास दानवे, भास्कर जाधव, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षाचे हे सर्व महत्त्वाचे नेते त्या समितीत होते. त्यांनी विधेयकाच्या ड्राफ्टचा सखोल अभ्यास केला. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा आम्ही केल्या आणि या सर्व विरोधी पक्षातील नेते असलेली संयुक्त समितीने त्या विधेयकाचा ड्राफ्ट मान्य केला आणि त्यानंतर विधानसभेत तो एक मताने पारित झाला. हे विधेयक कुठल्याही राजकीय पक्षाच्या, सामाजिक संघटनेच्या विरोधात नाही, विद्यार्थी संघटनांच्या विरोधात नाही. हे विधेयक माओवादी विचारसरणीला आळा घालणारा प्रस्तावित कायदा आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.




