‘आधार’ आता अधिक सुरक्षित आणि सोपे! नवीन ॲप लाँच; केवळ चेहऱ्याने होणार पडताळणी

New Aadhaar app launched : केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन आधार ॲप लाँच केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन आधार ॲपच्या बीटा व्हर्जनची माहिती दिली. हे ॲप नागरिकांना जास्त गोपनीयता, जलद ओळख पडताळणी आणि सुरक्षित डिजिटल अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवून विकसित करण्यात आले आहे.
“आधार पडताळणी आता UPI पेमेंट इतकीच सोपी झाली आहे,” अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी X (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर दिली आहे.
UIDAIच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या नव्या ॲपमध्ये एआय आणि फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात QR कोड स्कॅनिंगच्या मदतीने एका क्षणात आधार पडताळणी करता येते. त्यामुळे प्रवासादरम्यान, हॉटेल चेक-इन किंवा खरेदीसाठी झेरॉक्स प्रती बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.
हे ॲप केवळ व्यक्तीच्या संमतीनेच माहिती शेअर करते आणि कोणती माहिती कुणाशी शेअर करायची हे नियंत्रणही व्यक्तीच्या हातातच असते.
हेही वाचा – सतेज पाटील पुण्याचे काँग्रेस निरीक्षक
या नव्या ॲपमधील प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?
– फेस आयडी-आधारित लॉगिन आणि प्रमाणीकरण
-QR कोडद्वारे त्वरित आधार पडताळणी
-शारीरिक कार्ड किंवा कागदपत्रांची गरज नाही
-संपूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि संमती-आधारित प्रक्रिया
-गैरवापर, बनावटगिरी आणि डेटा लीकपासून सुरक्षा
अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, “या ॲपमुळे आधारची झेरॉक्स कुठेही देण्याची गरज पडणार नाही. हे ॲप डिजिटल स्वरूपात असून, माहिती फक्त तुमच्या संमतीनेच शेअर करता येते.”
सध्या हे ॲप बीटा चाचणी टप्प्यात आहे आणि लवकरच ते सर्व नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या पायरीमुळे आधारचा वापर अधिक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा