Mumbai Rain Update | पुढील ३ तास मुंबईस उपनगरात पावसाचा इशारा

मुंबई | मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नरिमन पॉइंट, दादर, वरळी, परळ, शीव, कुर्ला, घाटकोपर, पवई आणि भांडूप यासह अनेक भागांत गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
मोसमी पावसाचे मुंबईत आगमन झाल्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी पडत होत्या. मात्र, आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. विशेषतः चर्चगेट, परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल आणि फोर्ट या परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ‘हरित सेतू’ प्रकल्पासाठी ब्रँड डिझाइन स्पर्धेचे आयोजन
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे काही कमी उंचीच्या भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याचा परिणाम रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवांवर होण्याची शक्यता आहे. नागरिकांना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा आणि पाणी तुंबणाऱ्या भागातून प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.