पावसामुळे शेतीसोबतच फुलबागांवरही मोठा परिणाम
गणेशोत्सवात फुलांचे दर वाढले असून ग्राहकांच्या खिशाला फटका
डोंबिवली : सध्या राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतीसोबतच फुलबागांवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी फुलांचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेत फुलांची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी गुलाब, झेंडू, मोगरा, जाई, तुळस यांसारख्या फुलांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा तब्बल दुपटीने वाढले आहेत. नागरी भागातील बाजारपेठेत विशेषतः सण-समारंभात फुलांची मागणी वाढत आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात फुले उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी दर वाढवले आहेत.
झेंडूचा जुडगा जो मागील आठवड्यात २० ते २५ रुपयांना मिळत होता, तो आता ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुलाबाची पाकळ्यांची किंमतही तब्बल २०० रुपयांवर गेली आहे.शेवंतीचे दर ४०० रूपये किलो तर, गुलाब ६०० रूपये किलोने विकला जात आहे. इतर फुलांचे दरही दुप्पटीने वाढले आहेत. पावसामुळे फुलांची झाडे कुजणे, कळ्या गळून जाणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, यामुळे बाजारात मालाचा पुरवठा कमी झाला आहे. याउलट मागणी मात्र प्रचंड असल्याने दरात वाढ अपरिहार्य ठरली आहे. गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळातही अशीच परिस्थिती राहिल्यास फुलांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : घरकुलमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०५ वी जयंती जल्लोषात साजरी
पाच, सात आणि दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक उत्सवाची जय्यत तयारी असते. गणेश मुर्तीच्या आदरातिथ्यात कोणतीही कमी पडू नये, यासाठी गणेशभक्त तयारीला लागले आहेत सजावट आणि पूजेसाठी गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठात फुलांना सर्वाधिक मागणी असते. मात्र, मागील काही दिवसांपासन राज्यभरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पावसामुळे शेतातील फुलांचे नुकसान झाले असून फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यात पावसाच्या पाण्याने फुले भिजली जातात. त्यामुळे ती बाजारात दाखल होईपर्यंत कुजण्याचे प्रमाण जास्त असते. या कारणाने फुलांची आवक कमी होत आहे.
एकीकडे आवक घटली असतानाच दुसरीकडे गणेशोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. कल्याण शहरातील कृषी उत्पन्न बाजारात फुलांचे दर हे दुप्पटीने वाढले आहेत. पुणे, जुन्नर, नाशिक, सातारा, कोल्हापुर आणि सोलापूर या जिल्ह्यातून फुलांची आवक होते. ऐन गणेशोत्सवात फुलांची आवक घटली आहे. पावसामुळे फुलांचे नुकसान झाले त्याच्यामुळे किमती वाढलेल्या आहेत. तरीसुद्धा गेल्या वेळेच्या तुलनेने या किमती फार कमी आहेत असे विक्रेता अरुण सिंग यांनी सांगितले.
बाजारात फुलांचे दर काय?
गोंडा २०० रूपये किलो
शेवंती ४०० रूपये किलो
गुलाब ६०० रूपये किलो
मोगरा १२०० रूपये किलो
चाफा १००० रुपये किलो
कमळ ६०० रुपये डझन





