चीनची भारतात घुसखोरी? अरुणाचल प्रदेशात थेट रस्ते आणि लष्करी छावण्या उभारल्याचा स्थानिकांचा गंभीर आरोप

China land grab Arunachal Pradesh News | अरुणाचल प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सीमेवर चीनच्या कथित घुसखोरीचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. राज्याच्या अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील ‘नाह’ या स्थानिक आदिवासी समुदायाने चिनी लष्कराच्या (पीएलए) वाढत्या हालचालींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेल्या सहा वर्षांत चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करून स्थानिकांच्या शेतीयोग्य जमिनी, शिकारीच्या जागा आणि जनावरांच्या चराई क्षेत्रावर ताबा मिळवल्याचा धक्कादायक दावा या समुदायाकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, चिनी सैन्याने भारतीय भूभागावर थेट रस्ते आणि लष्करी छावण्या उभारल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ‘नाह वेल्फेअर सोसायटी’चे अध्यक्ष केरू चादर यांनी अप्पर सुबनसिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच एक सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या पूर्वजांची जमीन, जिथे आम्ही काही वर्षांपूर्वीपर्यंत मुक्तपणे फिरत होतो, शिकार करत होतो आणि वनउत्पादने गोळा करत होतो, ते संपूर्ण क्षेत्र आता चिनी पीएलएच्या ताब्यात गेले आहे. आम्हाला आमच्या भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास असून ते अनेक वर्षांपासून आमच्या जमिनीचे रक्षण करत आहेत. परंतु, टाकसिंग भागात चिनी लष्कराच्या सध्याच्या हालचालींचा हेतू आणि वेग पाहता लष्कराचे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत, परिणामी आम्ही आमची भूमी दिवसेंदिवस इंच-इंच गमावत आहोत, अशी विदारक स्थिती त्यांनी प्रशासनासमोर मांडली आहे.
हेही वाचा
वाकड-ताथवडेत टाक्या तयार, पण पाणीच नाही; नगरसेवक राहुल कलाटे
गेल्या १० ते १५ वर्षांत चीनने टाकसिंग सीमाभागात शक्य तितकी जमीन बळकावण्याच्या उद्देशाने आपल्या हालचाली लक्षणीयरीत्या वाढवल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आदिवासी संघटनेच्या मते, २०२० पर्यंत त्यांच्या पारंपारिक नियंत्रणाखाली असलेली अनेक ठिकाणे आता कथितपणे चिनी सैन्याने बळकावली आहेत. यामध्ये असाफिला भागातील ओयिंग, चुजार्ता भागातील पनियार, मार्नाफे भागातील मारपन, पोत्रांग तलाव आणि टिनडिंगटांग या टाकसिंग महसूल मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. ही सर्व ठिकाणे टाकसिंग मुख्यालयाच्या अगदी जवळ असून यातील काही ठिकाणांना स्थानिक लोक पवित्र तीर्थक्षेत्र मानतात. चीनने या ठिकाणांवर धोरणात्मक ताबा मिळवून आंतरराष्ट्रीय सीमेवरील आपले नियंत्रण वेगाने वाढवले आहे.
स्थानिकांच्या या गंभीर आरोपांनंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाचो मतदारसंघाचे आमदार नाकाप नलो यांनी स्पष्ट केले की, हा विषय थेट राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने या आरोपांचे प्रशासनाकडून अधिकृत प्रमाणीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. हा राष्ट्रीय मुद्दा असल्याने नागरिकांमध्ये आणि प्रशासनात चिंता वाटणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थानिकांच्या या निवेदनामुळे आता सीमाभागातील सुरक्षेचा आणि घुसखोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





