ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड-ताथवडेत टाक्या तयार, पण पाणीच नाही; नगरसेवक राहुल कलाटे

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प तातडीने पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी

पिंपरी- चिंचवड | वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण झालेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे मत नगरसेवक राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ विविध कारणांमुळे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे पुन्हा प्राधान्यक्रमावर आला असून, ३ जुलै रोजी मुंबई येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडून शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

कलाटे म्हणाले की, माझ्या प्रभागातील वाकड, ताथवडे आणि पुनावळे येथे ४५ लाख लिटर आणि २५ लाख लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्यांची उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र, पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने या टाक्या अद्याप कार्यान्वित करता आलेल्या नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची पायाभूत सुविधा असूनही नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

भाजपाकडून आगामी संघटनात्मक कार्यक्रमांवर ‘‘मंथन’’

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प हा केवळ पाणीपुरवठ्याचा नव्हे, तर भविष्यातील पाणी सुरक्षेचा विषय असल्याचे सांगत, मावळमधील शेतकऱ्यांना न्याय देतानाच पिंपरी-चिंचवडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री नुकतेच वाकड परिसराच्या दौऱ्यावर आले असताना, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केल्याचेही कलाटे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महापालिका सभागृहात सातत्याने पाठपुरावा केला असून, भविष्यातही शासन स्तरावर हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

“वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील लाखो लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या पाण्याअभावी वापराविना आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. मावळच्या शेतकऱ्यांना न्याय देत पिंपरी-चिंचवडकरांना कायमस्वरूपी पाणी सुरक्षा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

– राहुल कलाटे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button