भाजपाकडून आगामी संघटनात्मक कार्यक्रमांवर ‘‘मंथन’’
पिंपरी-चिंचवड कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक : संघटनात्मक कार्यक्रम, अभियानांचा आढावा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड जिल्ह्याची कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पिंपळे सौदागर येथील शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक कार्यक्रम, पक्ष विस्तार, विविध अभियानांचा आढावा आणि महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत गेल्या काही महिन्यांत शहरभर प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या पक्षाच्या विविध अभियानांचा आढावा घेण्यात आला. अभियानांमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक करण्यात आले. आगामी काळात संघटन अधिक गतिमान करण्यासाठी, बूथ स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजनावरही चर्चा झाली. पक्षाच्या बळकटीकरणासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटन भक्कम असून आगामी काळात ते अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून संघटनात्मक कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील. पक्षाचा विचार आणि शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यावर आमचा भर राहील.”
हेही वाचा – पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, राजकीय हालचालींना वेग
या बैठकीला आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमितभाऊ गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमरजी साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, सदाशिवराव खाडे तसेच सत्तारूढ पक्षनेते प्रशांतभाऊ शितोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पक्षाच्या आगामी संघटनात्मक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“भारतीय जनता पक्षाचे सामर्थ्य हे आपल्या समर्पित कार्यकर्त्यांमध्ये आणि मजबूत संघटनात आहे. आगामी काळात प्रत्येक बूथ अधिक सक्षम करून केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे संघटन आणखी भक्कम करू.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा.





