ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीत कचरा टाकण्यास नागरिकांचा तीव्र विरोध; कचरा गाड्या रोखल्या

मोशी दुर्घटनेनंतर देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या जागेचा पर्याय; स्थानिकांचा आक्रमक पवित्रा

पिंपरी- चिंचवड | मोशी कचरा प्रक्रिया केंद्रातील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात निगडीजवळील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ट्रेंचिंग ग्राऊंडवर कचरा साठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा नरळे आणि रामदास कुटे यांच्या नेतृत्वाखाली कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखण्यात आल्या.

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे तात्पुरत्या परवानगीची मागणी केली होती. त्यानुसार, स्टेशन मुख्यालय, देहूरोड यांनी १३ जुलै २०२६ रोजी पत्राद्वारे १२ ते १८ जुलै या कालावधीत दररोज ३० वाहनांमधील कचरा निर्दिष्ट जागेवर टाकण्यास परवानगी दिली होती.

मात्र, निगडी परिसरात कचरा टाकण्यास सुरुवात होताच स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. “मोशीचा प्रश्न सोडवण्यासाठी निगडीकरांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही,” अशी भूमिका घेत नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा नरळे आणि रामदास कुटे यांनी नागरिकांसह घटनास्थळी धाव घेत कचरा गाड्या अडविल्या.

हेही वाचा

एमआयटी महाविद्यालयात ११४ विद्यार्थ्यांचा सहभाग; व्यसनमुक्त युवा – विकसित भारत जनजागृती कार्यक्रम संपन्न

स्थानिकांनी प्रशासनावर टीका करत, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा जनसुनावणी न घेता परिसरात कचरा टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला. तसेच, कचऱ्यामुळे दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, देहूरोड स्टेशन कमांडर ब्रिगेडियर आशीष कटोच यांनी दिलेल्या परवानगीपत्रात महापालिकेने दिलेल्या आश्वासनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, स्थानिकांच्या विरोधानंतर या ठिकाणी कचरा साठविण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोशी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असून, महापालिकेसमोर पर्यायी व्यवस्था उभारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. निगडीतील वाढत्या विरोधामुळे प्रशासन पुढील निर्णय काय घेते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

“मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, त्यासाठी निगडीकरांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि स्थानिक नागरिकांचा विश्वासात न घेता निगडी परिसरात कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण नागरिकांच्या जिवाशी संबंधित प्रश्नांवर तडजोडही करणार नाही. जोपर्यंत प्रशासन या निर्णयाचा पुनर्विचार करत नाही, तोपर्यंत आमचा लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू राहील.”

– प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button