एमआयटी महाविद्यालयात ११४ विद्यार्थ्यांचा सहभाग; व्यसनमुक्त युवा – विकसित भारत जनजागृती कार्यक्रम संपन्न

आळंदी | विद्यार्थी विकास कक्ष, एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, यांच्या वतीने आणि अणुव्रत विश्व भारती सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्त युवा – विकसित भारत” या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
कार्यक्रमास उपसंचालिका डॉ. मानसी अतितकर, अधिष्ठाता डॉ. अमोल माने आणि प्रा. रश्मी लाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अणुव्रत विश्व भारती सोसायटीच्या आशाजी रांका यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला तर सीए मुदित भन्साली यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी पल्लवी महागांवकर यांनी केले होते.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर नोंदणी आणि ५ हजार रक्तदानाचे ‘‘लक्ष्य’’
कार्यक्रमाची सुरुवात आइस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटीने झाली. त्यानंतर परिचयात्मक चित्रफीत दाखवण्यात आली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. सीए मुदित भन्साली यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यानंतर “मेडिटेट टू एलिव्हेट” या ध्यानधारणा सत्राचे आयोजन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तरे आणि अभिप्राय सत्राने झाला.
या कार्यक्रमास एकूण ११४ विद्यार्थी आणि २४ प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शवली. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करून त्यांना विकसित भारताच्या दिशेने योगदान देण्यासाठी प्रेरित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाने सर्व सहभागी घटकांचे आभार मानले. संचालक डॉ. वाफारे आणि उपसंचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.





