Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

आता मागेल त्याला कृषीपंप; राज्यात १० लाखांहून अधिक लाभार्थी…

पुणे : सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (३ जून) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

देशात आतापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल ६४ टक्के म्हणजे १० लाख ४७२ कृषी पंपांचे एकट्या महाराष्ट्रात वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरित सर्व राज्यांमध्ये ३४ टक्के म्हणजे ५ लाख ६१ हजार ८१७ कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत.

महाराष्ट्राने महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत एकाच महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची कामगिरी केली. त्याची नोंद डिसेंबर २०२५ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

हेही वाचा –  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांच्याकडून अभिवादन

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ १० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांसाठी पाच टक्के लाभार्थी हिस्स्यावर तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. सौरपंपाच्या पॅनेल्समधून २५ वर्षे वीज निर्मिती होते. त्यामुळे आतापर्यंत १० लाखांवर शेतकऱ्यांची वीजबिलांमधून मुक्तता झाली आहे. तर दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळत आहे.

यासोबतच शेतातील विद्युत अपघातांचा धोकाही कमी झाला आहे. या सौर पॅनेल्समुळे सिंचनासह शेत घरातील विविध उपकरणे, मोबाईल चार्जिंग व ई-वाहन चार्जिंग करणेही सहज शक्य झाले आहे. तसेच शिल्लक विजेच्या आधारे शेतकऱ्यांना छोटे कृषिपुरक अन्य व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे.

सौर कृषी पंप योजनेतील प्रत्येक सौरपंपाला ५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार एजन्सीवर बंधनकारक आहे. तसेच सोलर पॅनेल्स आणि पंपाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती तसेच चोरीविरोधी विमा संरक्षणही उपलब्ध आहे.

सौर कृषिपंपाबाबत काही तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांना महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईट, २४ तास सुरु राहणारे टोल फ्री क्रमांक आणि संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करण्याची सोय उपलब्ध आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button