शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली, अमित शाहही घामाघूम; संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नव्या पुस्तकात ‘नरकातला स्वर्ग’ अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकात त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मदतीचा सविस्तर उल्लेख केला आहे.
शरद पवार हे यूपीए सरकार मध्ये असताना त्यांनी नरेंद्र मोदींची अटक कशी टाळली होती याबद्दलचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, या पुस्तकाचे प्रकाशन उद्या म्हणजे शनिवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच या पुस्तकाची चर्चा माध्यमांवर होताना दिसत आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते.तसेच अमित शाह हे एका खूनप्रकरणी आरोपी होते, त्यावेळेस युपीएचं सरकार होतं. मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती. पण त्यावेळी शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडलं की राजकीय मतभेद असतील, तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती.
दरम्यान, शरद पवारांच्या या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे नरेंद्र मोदींची त्यावेळी होणारी अटक टळली, असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी या पुस्तकात केला आहे. त्याचप्रमाणे अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी होते, तडीपार होते,असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे म्हणाले, अमित शाह यांची सीबीआय चौकशी सुरू होती. तेव्हा मोदींनी शरद पवारांना फोन करून विनंती केली की अमित शाह यांना या प्रकरणात मदत करा. तेव्हा सीबीआय चौकशीत त्या पथकातले महाराष्ट्र कॅडरचे एक अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधून शरद पवारांनी मदत केली होती, असाही दावा संजय राऊतांनी पुस्तकात केला आहे.