सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार भंग; तलाठ्यांच्या सत्कारामुळे प्रशासनात खळबळ, त्यांचा पाठिराखा कोण?

\सावंतवाडी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार न पाळल्याबद्दल दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, सुरक्षेतील त्रुटी आणि नियंत्रणातील कमतरतेबद्दल अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्या तलाठ्यांचा पाठिराखा कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी राजशिष्टाचार पाळला नाही. त्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजन आणि दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची या दोन्ही अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावर नाराजी व्यक्त करत, लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई झालेल्या या दोघांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप केला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तक्रार केली होती. यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दोघा तलाठ्यांना निलंबित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच नियंत्रण योग्यरित्या न ठेवल्याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील आणि कणकवली प्रांताधिकारी जगदीश काकतकर यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना तात्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि कणकवली करंजे येथे गोवर्धन शाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमांदरम्यान तलाठी एस. पी. हांगे आणि व्ही. व्ही. कंठाळे हे राजशिष्टाचार न पाळता आणि मुख्यालय सोडण्याचे आदेश नसतानाही मालवण कार्यक्रमात पोहोचले व मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला गेले. यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी लाचखोरी तलाठ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, अशी टीका केली होती.
हेही वाचा – ‘भारतात आयफोन बनवू नका’; डोनाल्ड ट्रम्प यांचा अॅपलला इशारा
मुख्यमंत्र्यांच्या झेड प्लस सुरक्षा असताना तलाठ्यांना कार्यक्रमाला जाण्याची परवानगी कशी दिली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मालवण कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीही नियंत्रणाची जबाबदारी न पडल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, कणकवली तालुक्यातील करंजेच्या कार्यक्रमाची जबाबदारी कणकवली प्रांताधिकारी जगदीश काकतकर यांच्यावर होती. त्यांनीही नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या दोन तलाठ्यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली असली तरी त्यांना मुख्यमंत्री यांच्यापर्यंत कोणी नेले? त्यांनी एवढे मोठे धाडस दाखवले त्यामागे कोणाचा तरी आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे त्यांचा आका कोण? हे जनतेला कळले पाहिजे, तसेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सुरक्षा कवच भेदून पोहोचले आणि त्यांचा सत्कार केला. त्यांचा पाठिराखा कोण? हे समोर आले पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, दोन तलाठ्यांना निलंबित करून भागणार नाही, तर बडतर्फ केले पाहिजे. त्यांचा पाठीराखा जनतेला कळला पाहिजे.