राज्यातील भटक्या विमुक्तांना आता कोठेही मिळणार रेशनिंग; शेतीसाठी जमीनही मिळणार?

मुंबई : राज्यातील भटके विमुक्त समाजाला कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य देण्याबाबतचा महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
तसेच भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्याच्या सूचनाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिल्या आहेत.या बैठकीत बावनकुळे यांनी भटक्या समाजाच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले. तसेच या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमीनीवर भटके समाजाची वस्ती आहे. त्या आधारावर पंधरा दिवसात आराखडा सादर करून जमीन देण्याबाबत विचार केला जाणार आहे.
हेही वाचा – शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली, अमित शाहही घामाघूम; संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
भटक्या समाजासाठी घेतलेले निर्णय
-गृहभेटी आधारावर जात प्रमाणपत्र
-शाळा, महाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जातीचे दाखले
-१९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र.
-भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र.
-विविध दाखले देण्यासाठी शिबीरांचे आयोजन
-१९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.
-आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय.
-तात्पुरते ऐवजी कायमस्वरुपी रेशनकार्ड
-सरकारी किंवा खासगी जमीनीवर वसलेल्या भटक्या समाजाचे सर्वेक्षण.
-भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण.
-जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी.
-अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार
-भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे.