देशात सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात, अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

Divorce Case in Maharashtra | देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून गेल्या तीन वर्षांत घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशात सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशातील एकूण घटस्फोटांपैकी १८.७ टक्के घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या अहवालात घटस्फोटांच्या कारणांचाही उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्रव्यतिरिक्त कर्नाटकमध्ये ११.७ टक्के, पश्चिप.बंगाल ८.२ टक्के, दिल्ली ७.७ टक्के, तमिळनाडूत ७.१ टक्के, तेलंगणात ६.७ टक्के, केरळ ६.३ टक्के तर राजस्थानमध्ये २.५ घटस्फोटाची प्रकरणं नोंदवली जात आहेत. सर्वाधिक घटस्फोट २५ ते ३४ या वयोगटातील असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
हेही वाचा : आयपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा चाहत्यांसाठी असणार खास, BCCI ने घेतला मोठा निर्णय
या अहवालानुसार, वाढत्या घटस्फोटांच्या कारणांमध्ये सोशल मीडिया हे मुख्य कारणांपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरित परिणाम होताना दिसतो आहे. याशिवाय व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण होणारे तणाव, नोकरीमुळे जोडीदाराला देता न येणारा वेळ, महागाईतून होणारी आर्थिक कोंडी, जबाबदाऱ्यांमुळे नात्यातील ओलावा कमी होणे आणि वैवाहिक नातेसंबंधांबाबत संशयाचं वातावरण निर्माण होणे, ही सुद्धा वाढत्या घटस्फोटाची कारणं आहेत.