स्वारगेट प्रकरण : आगारातील अधिकाऱ्यांचे निलंबन; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

Mdhuri Misal : स्वारगेट बस आगारात २५ फेब्रुवारी या दिवशी एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या धक्कादायक घटनेनंतर राज्यभरातून तीव्र स्वरुपाची संतापाची लाट उसळून आली होती. आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुगाट गावातील शेतामधून अटक केली. या घटनेनंतर स्वारगेट आगारातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कामावर असलेल्या २२ सुरक्षा रक्षकांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट स्थानकातील अॅाडिट करण्याचे आदेश दिले होते. या अॅाडिटमध्ये स्थानकात अनेक त्रूटी आढळून आल्या. पोलीस या प्रकरणात सखोल चौकशी करत असून घटनेच्या दिवशी कामावर असलेल्या स्थानकातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याविषयीची माहिती परिवहन राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
हेही वाचा – आकाशचिन्ह विभागाला अवघे १६ कोटींचे उत्पन्न
स्वारगेट प्रकरणात आगाराचे प्रमुख हे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्वारगेट आगारातील आगरव्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक अधिक्षक या चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. तसेच २२ सुरक्षा रक्षकांना बदलण्यात आल्याचे देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या