आयपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा चाहत्यांसाठी असणार खास, BCCI ने घेतला मोठा निर्णय

IPL 2025 | इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची सुरुवात २२ मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनीय सामना होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी BCCIने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे १८ वे पर्व चाहत्यांसाठीही खास बनवण्यासाठी सर्व १३ ठिकाणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे.
आयपीएल २०२५ चा पहिला उद्घाटन सोहळा २२ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे एका भव्य समारंभात होईल. यामध्ये ३० मिनिटांच्या कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार आणि संगीत जगतातील प्रसिद्ध व्यक्ती सादरीकरण करतील. यानंतर प्रत्येक मैदानावरील पहिल्या सामन्याच्या सुरुवातीला एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होतील.
हेही वाचा : विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या पूजेची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी, ‘अशी’ करा नोंदणी
२२ मार्च रोजी कोलकाता येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सादरीकरण करतील. यावेळी आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह देखील उपस्थित राहतील. कोलकाता व्यतिरिक्त इतर १२ ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी बॉलिवूड कलाकारांचा एक वेगळा गट सादर करण्याचा विचार आहे. या कार्यक्रमांसाठी दोन ते तीन कलाकारांची निवड केली जाऊ शकते. यासाठी कलाकार आणि सेलिब्रिटींची यादी १९ मार्चपर्यंत तयार केली जाईल.