उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार आयटीआयमध्ये नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम…

मुंबई : राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभवातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावे, यासाठी कौशल्य विभाग प्रयत्नशील राहील, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पीपीपी मॉडेल धोरणाबाबत विविध उद्योजकांशी संवाद साधताना लोढा बोलत होते. उद्योग समूहांच्या सहकार्याने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
राज्यातील आयटीआय, तसेच तंत्र शिक्षण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन नामवंत उद्योग समुहांची मदत घेत आहे. उद्योग समूहांकडे असलेला अनुभव या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण काळातच उद्योग समूहांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले तर यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचेल.
उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावे, यासाठी आयटीआय परिसरात स्वतंत्र जागा उपलब्ध करण्यात येईल. उद्योग समूहांनी शासनासोबत भागीदारी केल्यास त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल आणि रोजगार निर्मितीही होईल, असे लोढा यांनी सांगितले.
राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. शहर, औद्योगिक भागात, तसेच तालुका स्तरावरही आयटीआयने विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. उद्योगांनी शासनाशी भागीदारी केल्यास त्यांना संबंधित आयटीआयमध्ये आवश्यक असलेल्या मनुष्यबळानुसार अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवता येईल. त्याकरिता संबंधित उद्योग समूहाला कार्यालयासाठी अथवा सेवा केंद्रासाठी लागणारी जागा त्याच आयटीआयमध्ये उपलब्ध करण्यात येईल.
दिवसभरात नियमित अभ्यासक्रमानंतर सायंकाळी उद्योग समूहाला विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम स्वतंत्ररित्या शिकवता येईल. याशिवाय काही अल्प काळाचे अभ्यासक्रमही येथे शिकवता येतील, असेही त्यांनी सांगितले.





