शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे शिवसेना एकत्र; कणकवलीत खासदार राणेंनी घडवले, जे इतरांना जमले नाही! : पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी : शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांना एकत्र आणायला जे कोणाला जमले नाही, ते खासदार नारायण राणे यांच्या कणकवलीमध्ये घडले, असे स्पष्टीकरण पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिले. “ज्या पक्षात आपण आहोत, तेथे प्रामाणिकपणे काम करण्याची खासदार नारायण राणे यांची शिकवण आहे, ती आमदार निलेश राणे शिवसेनेत करत आहेत,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धा सावंत भोसले यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे आले असता ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष उमेदवार सौ. श्रद्धा सावंत भोसले, भाजपचे प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष लखम सावंत भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री राणे म्हणाले, “कणकवलीमध्ये हे नवीन नाही. नारायण राणे यांच्या कारकिर्दीत अनेक लोक एकत्र आले आहेत, पण कणकवलीने नेहमीच नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ दिली आहे.”
राजकीय भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, “निवडणूक कोणीही लढवू शकतो. खासदार राणे यांनी आम्हाला शिकवले आहे की, ज्या पक्षात आहोत तेथे प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.”
मी आणि खासदार नारायण राणे भाजपचे काम प्रामाणिकपणे करत आहोत. तर, आमदार निलेश राणे शिवसेनेत (शिंदे गट) आहेत, त्यामुळे ते त्या पक्षाचे काम करत आहेत. याचमुळे, निलेश राणे कणकवली येथे येऊन शहर विकास आघाडीचा प्रचार करतील. त्यांनी एकत्र राहावे. ”आम्ही राजकीय आणि वैयक्तिक टीका करणार नाही, तर निवडणूक असलेल्या नगरपरिषदेच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जात आहोत,” असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी शेवटी स्पष्ट केले.




