Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? कोर्टाचा पोलिसांना सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं?

Akshay Shinde Encounter | बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीवरून न्यामूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सादर करण्यास सांगितले आहेत.

कोर्टात नेमकं काय घडलं?

न्यायमूर्ती मोहिते डेरे : मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी केव्हा नेला? त्याचा व्हिडिओग्राफ आहे का? मृत्यूचं नेमकं कारण काय? अक्षयला आणि ऑफिसरला नेमकी कोठे दुखापत झाली?

सरकारी वकील : मृतदेह सकाळी ८ वाजता जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. डोक्यात आरपार गोळी गेली होती. पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी छेदून गेली.

न्यायमूर्ती चव्हाण : फॉरेन्सिक चाचणी झाली का? ते कोणतं शस्त्र होतं? पिस्तुल लोड झाली होती का? त्याला पिस्तुल लोड करता येत होती का?

सरकारी वकील : झटापटीत ती पिस्तुल लोड झाली.

हेही वाचा   –    ‘मला माफ करा, मी माझे शब्द..’; कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून कंगनाने मागितली माफी 

न्यायमूर्ती चव्हाण : पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो.

गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितलं.

अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं. अशाही प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.

त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही, असंही न्यायमूर्ती म्हणाले.

याप्रकरणातील जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे वैद्यकीय अहवालही कोर्टाने मागितले आहेत. तसंच, अक्षयने विशिष्ट अतंराने गोळीबार केला की पाँइट ब्लँक रेंज गोळीबार केला याचा फॉरेन्सिक अहवालही कोर्टाने मागवला आहे. तसंच, एका बाजूला गोळी लागून ती दुसऱ्या बाजूला कुठे गेली असा सवालही त्यांनी विचारला.

त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असं तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असंही न्यायमूर्तींनी विचारलं. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button