ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भगवान हिम्मतराव सदावर्ते यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘विना छताची शाळा’

‘विना छता’ची शैक्षणिक चळवळ

बुलढाणा : भगवान हिम्मतराव सदावर्ते हे स्पर्धा परीक्षेचे उमेदवार ही बिना छताची शाळा चालवतात. आपण या मुलांसाठी काही करायला हवे या ध्यासाने ते थेट कामाला लागले. या शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विना छताची शाळा तरुणांमध्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची ठरत आहे.

मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील भगवान हे शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरला आले. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून उदरनिर्वाहासाठी सिद्धार्थ उद्यान परिसरातील शक्तीनगर इथे सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे. घरची जेमतेम परिस्थिती. मात्र वडिलांना शिक्षणाची आवड. काही झाले तरीही शिक्षण पूर्ण करा, असे वडील म्हणायचे. हाच आदर्श घेत भगवानने लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. यादरम्यान, भगवान यांना वेगवेगळ्या ठिकाणी शाळाबाह्य मुले दिसायची. विशेषतः लॉकडाउनमध्ये अनेकांची शाळा सुटल्याचे त्यांना जाणवले.

मग त्यांनी शक्तीनगरपासून सुरुवात इथल्या खुल्या जागेत पहिल्यांदा शाळा भरवली. नंतर चिकलठाणा परिसर, धूत हॉस्पिटल भागातील भंगारविक्रेत्या मुलांना ते त्यांच्या वस्तीत जाऊन शिकवायचे. मग वाळूज भागात रस्त्यावर वेगवेगळे साहित्य विकणाऱ्या मुलांसाठी पालावरच शाळा सुरू केली. आपले काम, अभ्यास सांभाळून भगवान स्वखर्चाने या मुलांना शिकवायचे. कधी रिक्षाने, कधी सायकलवर जायचे. पण शाळेत खंड नसायचा. प्राारंभी पालकांची समजूत घालणे अवघड गेले. पण नंतर तेही मुलांना पाठविण्यास राजी झाले. म्हणूनच चार- पाच मुलांपासून झालेली ही सुरुवात आज ७० हून अधिक मुलांपर्यंत पोचली.

हेही वाचा –  महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! सातबारा उतारा आता थेट व्हॉट्सॲपवर…

‘विना छता’च्या शाळेचे स्वरूप
शिकवताना भाषेचीही अडचण व्हायची.वाडी, वस्तीवरची, परराज्यातील मुलांची भाषा वेगळी होती. तरीही भगवान यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि हळूहळू मुलांनाही भाषा समजू लागली. आता मुलच त्यांच्या या शिक्षकाची वाट बघतात. भाग्यनगरजवळची झोपडपट्टी, चिकलठाणा परिसर, धूत हॉस्पिटलाजवळचा भाग, वाळूज, लेणीजवळचा परिसर अशा वेगवेगळ्या भागात भगवान या मुलांना शिकवतात. ५ ते १५ वयोगटातील मुलांना त्यांनी अंक ओळख, अक्षरांची ओळख ते विविध विषय, सामान्य ज्ञान आदी विषयांची गोडी लावली. दररोज दुपारी २ ते ७ ही शाळा भरते. तर रविवारी मुलांसाठी फक्त खेळ असतात.

भगवान दररोज सायंकाळचे तीन तास आलटून -पालटून शाळा भराव्यात. अजूनही कधी मैदान, सभागृह शेजारी, वृक्षाच्या सावलीत, थेट पालावर, वस्तीत ही शाळा सुरू असते. पाऊस किंवा खिशात पैसे नसले की त्याच दिवशी भगवान यांची ‘बिना छताची’ शाळा बंद असायची‌. आता मात्र त्यांचे प्रयत्न बघून दाते पुढे आली. कुणी पुस्तके दिली, कुणी शालेय साहित्य दिले. यावर्षी तर त्यांच्या शाळेतील दोन विद्यार्थिनींनी दहावीत उत्तम गुण मिळवले. या दोन्ही मुलींचे पालक कामासाठी गावोगावी फिरतात. एकीने ६८ टक्के तर दुसरीने ९४ टक्के गुण मिळवले. या मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी भगवान यांचे प्रयत्न सुरू आहेत.

भगवान यांच्या कामाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. सरमा यांच्या हस्ते सदावर्ते यांचा सत्कार झाला. एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) राज्यस्तरीय ‘ मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श समाजरत्न पुरस्कार’ – २०२३ आदी पुरस्कारांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात भगवान यांनी ४० मुलांना जवळच्या शाळांत प्रवेश करून दिला. मात्र अजूनही ३० मुलांचे ओळखपत्र तयार होत नसल्याने ही मूल मात्र विना छताच्या शाळेतच शिकतात.

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा व वाळूज भागात राहणारी ही मूल भटके विमुक्त समाजातील, काहींचे पालक भंगार विकतात, तर काहींचे पालक कचरा वेचतात‌. विना छताच्या शाळेतील ३० मुलांचे आधारकार्ड, जात प्रमाणपत्र तयार होत नसल्याने अडचण होत आहे. अर्थात शाळाबाह्य मुलांच्या हा प्रश्न लगेच सुटणारा नाही. दाते तर पुढे येऊन या मुलांना शैक्षणिक साहित्य, नवे कपडे, खाऊ ,पुस्तके देतात. पण प्रशासनाने या कामाची दखल घेतली तर ‘विना छतात’ शिकणारे प्रत्येक मूल शाळेतही जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

रस्त्यांवर पैसे मागणारी, सिग्नलवर सामान विकणारी, भंगार विक्रेत्यांची मुलं, पालावर राहणारी मुलं आपण पाहतो. त्यांची बिकट स्थिती पाहून काही जण मदतीचा हात पुढे करतात. अशा वेळी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या या मुलांत शिक्षणाविषयी उदासीनता असते. पण या मुलांच्या आयुष्यात शैक्षणिक पहाट आणण्याचा निर्धार एका तरुणाने केला आणि तो तडीस नेला. या मुलांसाठी तरुणाने विनाछताची शाळा सुरू केली.

– पृथा वीर, छत्रपती संभाजीनगर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button