मराठीतील पाच हजार दुर्मिळ हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात! २०३० पर्यंत १० अब्ज शब्दांचा एआय कॉर्पस; राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर…

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र,२०४७’ अभियानाअंतर्गत मराठी भाषेचे डिजिटायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित मराठी शब्दकोश निर्मिती आणि दुर्मिळ हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी राज्य सरकारने कृती आराखडा जाहीर केला आहे. २०३० पर्यंत १० अब्ज शब्दांचा एआय कॉर्पस तयार करण्यासह ५ हजार दुर्मिळ हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ‘व्हिजन महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. यात मराठी भाषेला आधुनिक आणि सर्वसमावेशक स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषेचे डिजिटायझेशन, एआय आधारित शब्दकोश निर्मिती आणि प्राचीन दस्तावेजांचे जतन करण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत छापील साहित्याचे स्कॅनिंग, ऑडिओ संग्रह, मराठी नाटकांचे संहिताकरण आणि विविध स्त्रोतांतील माहिती संकलित करून १० अब्ज शब्दांचा एआय कॉर्पस तयार करण्यात येणार आहे. या आधारे मराठीचा एआय-आधारित शब्दकोश विकसित केला जाणार आहे.
सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आराखड्यानुसार, २०४७ पर्यंत एआय कॉर्पससाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असून, डेटा संकलनासाठी विशेष ॲप आणि प्रणाली विकसित केल्या जातील. २०२८ ते २०३० या कालावधीत कोट्यवधी ‘ॲनोटेशन्स’ तयार करून अंतिम शब्दकोश विकसित केला जाणार आहे.
हेही वाचा – ‘पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा’; मंत्री प्रकाश आबिटकर
याशिवाय दुर्मिळ मराठी हस्तलिखिते आणि प्राचीन दस्तऐवजांचे ओसीआर तंत्रज्ञानाद्वारे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. २०३० पर्यंत किमान ५ हजार हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि भाषांतर/लिप्यंतर पूर्ण करून ती ई-बुक स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रकल्पात मुंबई विद्यापीठासह विविध विद्यापीठे, महाविद्यालये तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येईल. राज्य मराठी विकास संस्थेला हस्तलिखिते शोधणे, डिजिटायझेशन आणि भाषांतराची जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारने भाषांतर करताना सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ जपण्याचे निर्देश दिले असून, कॉपीराइट नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. अनुवादक, लिप्यंतरकार आणि मुद्रितशोधक यांना शब्दसंख्या किंवा पृष्ठसंख्येनुसार मानधन देण्यात येईल.
महत्त्वाचे मुद्दे
- १० अब्ज शब्दांचा मराठी एआय कॉर्पस
- एआय आधारित मराठी शब्दकोश
- ५ हजार दुर्मिळ हस्तलिखितांचे डिजिटायझेशन
- ई-बुक स्वरूपात साहित्य उपलब्ध होणार
- मुंबई विद्यापीठासह विविध संस्थांचा सहभाग





