डबेवाल्यांची सेवा महागली, महागाईचा फटका टिफिनवर!
नोकरदारांसाठी डबेवाल्यांची सेवा २०० रुपयांनी महागली

मुंबई : नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा २०० रुपयांनी महागली आहे. जूनपासून नवा दर लागू होणार आहे, अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली.
मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन आणि नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट (मुंबई डबेवाला) कडून ही सेवा अखंड सुरू असते. महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम या पार्श्वभूमीवर जून २०२५ पासून डब्याच्या दरात २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुके यांनी सांगितले.
दरम्यान, हा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण हाेता; मात्र अधिक चांगली सेवा देण्यासाठी हे आवश्यक आहे, असे मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे म्हणाले.
हेही वाचा – महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! सातबारा उतारा आता थेट व्हॉट्सॲपवर…
आषाढी एकादशीला सुट्टी
वारी ही महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती यांचे प्रतीक असून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या घेऊन भक्तगण पंढरपूरकडे जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हा सोहळा पार पडतो. मुंबई डबेवाले याला एक सामूहिक श्रद्धायात्रा मानतात. त्यामुळे संतांच्या परंपरेला आणि वारकरी संप्रदायाशी घट्ट नाते असलेल्या डबेवाल्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला सेवा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी सर्व डबेवाले विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर यात्रा करणार असल्याने सेवा एक दिवसासाठी थांबवण्यात येणार आहे.