सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं नाव का बदललं? दिग्दर्शकाने सांगितलं कारण..

Salman Khan Movie Name Change : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. १६ मार्च रोजी चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत ‘बॅटल ऑफ गलवान’चे नाव बदलून ‘मातृभूमी में वॉर रेस्ट इन पीस’ असे नाव ठेवण्यात आले आहे.
चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा होत आहेत. अशातच यावर चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्वा लाखिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मातृभूमी में वॉर रेस्ट इन पीस’ हे नाव करण्यामागचे कारण सांगत दिग्दर्शक म्हणाले, “सलमानसरांच्या चाहत्यांना हा निर्णय अचानक घेतला गेला आहे, असं वाटू शकतं; पण हा विचार आम्ही सुरुवातीपासूनच केलेला होता. आम्ही ‘बॅटल ऑफ गॅलवान’ आणि ‘मातृभूमी’ अशी दोन्ही नावे नोंदवली होती. चित्रपट तयार करताना आम्हाला जाणवले की, यात फक्त लढाईच दाखवलेली नाही, तर हा चित्रपट माणुसकी आणि सहानुभूतीवरसुद्धा आधारित आहे.”
HT City शी बोलताना पुढे ते म्हणाले, “‘मातृभूमी में वॉर रेस्ट इन पीस’ हे नाव भावना आणि त्याग अधिक प्रभावीपणे व्यक्त करतं. त्याशिवाय ‘मातृभूमी’ नावाचे एक गाणेसुद्धा चित्रपटात आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळेच ‘मातृभूमी’ नाव अधिक योग्य वाटले.”
हेही वाचा – रुग्णांना वेठीस धरणाऱ्या रुग्णालयांवर होणार फौजदारी कारवाई
सलमान खानला चित्रपटाचे नाव बदलण्याचा आणि चीनविरोधी सीन्स कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सलमानने हा सल्ला गांभीर्याने घेत चित्रपटात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे चित्रपटातील काही सीन पुन्हा चित्रित करावे लागले. त्यामुळे निर्मिती खर्चही वाढला. पण सलमानने त्याचा विचार न करता, चित्रपट भावनिक आणि देशभक्तीवर आधारित बनवण्यावर भर दिला.
दरम्यान, चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये सलमान खान रक्ताने माखलेल्या आणि जखमी अवस्थेत दिसत आहे. काट्यांच्या तारा गुंडाळलेला एक खांब तो स्वतःवर आदळण्यापासून रोखताना दिसत असून, त्यावर ‘मातृभूमी’ हे नवीन नाव ठळकपणे दिसत आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण पूर्ण झाले असून, मे महिन्यापर्यंत पॅचवर्क पूर्ण होईल. संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हा चित्रपट जुलै ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
‘सलमान खान फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्वा लाखिया यांनी केले आहे. त्यात सलमानबरोबर अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत आहे. भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्यागाची गाथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे.





