अमेरिकेचा इराणवर पुन्हा हवाई हल्ला! ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कोणाचीही हुकूमशाही चालणार नाही’, ट्रम्प यांचा ओमानलाही थेट इशारा

US Iran Air Strike Middle East conflict | पश्चिम आशियातील (मिडल ईस्ट) राजकीय आणि लष्करी तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, अमेरिकन लष्कराने या आठवड्यात इराणवर दुसरा मोठा ‘बचावात्मक’ हवाई हल्ला केला आहे. या कारवाईत इराणचे चार ड्रोन पाडण्यात आले असून, पाचवे ड्रोन डागण्याच्या तयारीत असलेला इराणचा एक तळ अमेरिकेने पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या लष्करी कारवाईदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) कोणाचीही हुकूमशाही चालणार नाही,’ असा कडक इशारा दिला आहे.
अमेरिकन लष्कराच्या या गुप्त आणि अत्यंत संवेदनशील कारवाईची माहिती दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘द असोसिएटेड प्रेस’ (AP) या वृत्तसंस्थेला दिली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीला इराणच्या हालचालींमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. इराणकडून आक्रमक कारवाया सुरू असल्याचे स्पष्ट होताच, अमेरिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून हा हल्ला केला. इराणचे पाचवे ड्रोन हवेत झेप घेण्यापूर्वीच अमेरिकेने क्षेपणास्त्र डागून त्यांचा तळ उडवला.
हेही वाचा
इराण-ओमानचा नियंत्रण मिळवण्याचा दावा ट्रम्प यांनी फेटाळला
इराणमधील सरकारी टीव्हीने दावा केला होता की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी एका अनधिकृत कराराचा मसुदा तयार झाला आहे. या मसुद्यानुसार, इराण आणि ओमान संयुक्तपणे या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करणार आहेत.
मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅबिनेट बैठकीत इराणचा हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार ट्रम्प म्हणाले, “होर्मुझच्या समुद्रधुनीवर कोणीही नियंत्रण मिळवू शकत नाही. हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहे. ओमानलाही इतर देशांप्रमाणेच नियमांचे पालन करावे लागेल, अन्यथा आम्हाला त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल. मला खात्री आहे की त्यांना ही भाषा समजेल आणि ते सहकार्य करतील.”
ओमानसोबतच्या संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता?
अमेरिकेचे ओमानसोबत गेल्या अनेक दशकांपासून मजबूत आर्थिक आणि लष्करी संबंध राहिले आहेत. असे मैत्रीपूर्ण संबंध असतानाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओमानचा थेट उल्लेख करत लष्करी कारवाईचा इशारा दिल्याने जागतिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक खनिज तेल (क्रूड ऑईल) वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मार्ग मानला जातो. या जागतिक जलमार्गावर इराणचा प्रभाव पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अमेरिका सध्या आपल्या लष्करी ताकदीचा उघडपणे वापर करत असल्याचे या सलग दुसऱ्या हवाई हल्ल्यावरून स्पष्ट झाले आहे.





