महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! सातबारा उतारा आता थेट व्हॉट्सॲपवर…

Satbara Utara Directly Available On WhatsApp : महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अभिनव आणि ऐतिहासिक डिजिटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून, सातबारा उतारा , 8अ उतारा, फेरफार नोंद आणि ई-रेकॉर्ड्स हे जमिनीसंबंधी महत्त्वाचे दस्तऐवज नागरिकांना थेट त्यांच्या व्हॉट्सॲपवर अवघ्या 15 रुपयांत मिळू शकणार आहेत.
ही योजना 15 जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात हळूहळू तिचा विस्तार केला जाईल. या नव्या सुविधेमुळे शेतकरी आणि जमीनधारक नागरिकांना महा ई-सेवा केंद्रात रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे वेळ, पैसा आणि त्रास या तिन्हींची बचत होणार आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम महाभूमी पोर्टल (https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in) वर जाऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. नोंदणीच्या वेळी एकदाच 50 रुपयांचं शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा सादर करावा लागणार आहे. मोबाईल क्रमांक ओटीपीच्या माध्यमातून पडताळून नोंदणी पूर्ण झाली की, नागरिकांना सातबारा, 8अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड्स हे दस्तऐवज थेट त्यांच्या व्हॉट्सअॅपवर प्राप्त होतील.
हेही वाचा – ‘नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत; अंगावर केसेस, भानगडी अन्….; गोगावलेंचे खळबळजनक विधान
सेवेचे फायदे काय?
– फक्त १५ रुपयांत घरबसल्या आवश्यक कागदपत्रे उपलब्ध
– महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी आणि दलालांचा त्रास टळणार
– फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल
– कागदपत्रांची सुरक्षितता आणि गोपनीयता अबाधित राहील
– संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, पारदर्शक आणि एजंटविना
या सेवेअंतर्गत केवळ आवश्यक दस्तऐवजच नव्हे, तर जमीनमालकीसंबंधी कायदे, प्रक्रिया आणि संबंधित माहितीसाठी मार्गदर्शन देखील मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने सुरू केलेली ही सेवा केवळ डिजिटल नवकल्पनाच नाही, तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खरी मदतीची वाट ठरणार आहे. पारदर्शकता, सुलभता आणि तांत्रिक प्रगतीचा आदर्श ठरवणाऱ्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.