गणेशोत्सव 2023ः गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती
गणेश चतुर्थीचा इतिहास, आपण गणेश चतुर्थी का साजरी करतो?
पुणेः हिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची, ज्ञानाची देवता मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात. कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे. या गणेश चतुर्थीचा इतिहास, आपण गणेश चतुर्थी का साजरी करतो? याचे महत्त्व, त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी कशाप्रकारे साजरी केली जाते? याबाबतची सगळी माहिती महाईन्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात गणेश चतुर्थीची माहिती.
आपल्या भारताला धार्मिक संस्कृती आहे. त्यामुळे येणारे प्रत्येक सण संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. श्रावण महिना लागला की, सण उत्सवांना सुरुवात होते. मग वेध लागतात, नागपंचमीचे, त्यानंतर गोकुळाष्टमीचे आणि नंतर गणेश चतुर्थीचे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
गणेश चतुर्थीचा इतिहासः
स्कंदपुराण, नारद पुराण, त्याचप्रमाणे याज्ञवल्क्य स्मृती, महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्ये गणपतीचा उल्लेख आढळून येतो. पाचव्या आणि आठव्या शतकामध्ये एलोरा लेण्यांसारख्या हिंदू, बौद्ध, जैन मंदिरांमध्ये केलेल्या कोरीव कामांमध्ये गणेशाच्या मूर्ती विराजमान असल्याचे दिसून येते. गणेश चतुर्थीचा उगम हा प्राचीन काळापासून आहे. परंतु सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या गणेश चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले.
त्यानंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या सणाचे रूप बदलले. आणि लोकप्रिय केले. ब्रिटिश लोकांनी आपल्या भारतावर वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि आपल्या देशाप्रती असलेली देशप्रेमाची भावना वाढवण्यासाठी टिळकांनी हा गणेश उत्सव साजरा केला. यामुळे आता गणेश चतुर्थी हा सण देशभरात साजरा होणारा एक महत्त्वाचा सण मानला जातो.
या वर्षीचा गणेश चतुर्थी मुहूर्त कधी आहे?
यावर्षी गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३ मंगळवार या दिवशी आहे. याच दिवशी विनायक चतुर्थी देखील आली आहे.
मुहूर्त सुरू – सकाळी ११.०७ पासून.
मुहूर्त समाप्त – दुपारी ०१.३४ पर्यंत.
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र का बघू नये…?
गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्र दर्शन करू नये. यासाठी फार पूर्वीपासून एक कथा सांगितली जाते. एके दिवशी आपले लाडके बाप्पा श्री गणेश मूषकावर बसून मोठ्या लगबगिने कुठेतरी जात होते. तेव्हा त्या गडबडीत असताना ते घसरले आणि पडले. त्यांना पडलेले पाहून चंद्र जोरात हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पाला राग आला. आणि त्याने चंद्राला शाप दिला. बाप्पा म्हणाला, आजपासून तुझं तोंड कोणीही पाहणार नाही. जो तुझे तोंड पाहिलं, त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. गणपती बाप्पाच्या या बोलण्यामुळे चंद्र मात्र चांगलाच घाबरला आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी मोठमोठे तप सुरू केले.
हरतालिका पूजा व्रतकथा
चंद्राच्या या भक्तीने गणपती बाप्पा देखील प्रसन्न झाले. आणि त्यांनी चंद्राला उ:शाप दिला की, फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझा तोंड कोणीही पाहणार नाही. त्यानंतर चंद्राने गणपती बाप्पाकडे विनंती केली की, जर एखाद्याने चुकून त्या दिवशी माझे दर्शन घेतले तर त्यांनी काय करावे माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला व्हायला नको. यावर बाप्पाने सांगितले की, संकष्टी चतुर्थी व्रत केल्यास त्या व्यक्तीची खोट्या आळातून मुक्तता होईल. म्हणून या दिवशी कोणीही चंद्र दर्शन करत नाही.
गणेश चतुर्थी का महत्वाची आहे?
हिंदू कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा सण म्हणून गणेश चतुर्थीला पाहिले जाते. हा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने भक्तीने आनंदाने साजरा केला जातो. या सणाला अनेक कारणांमुळे महत्त्व प्राप्त होते. हा सण भारतीय संस्कृती, वारसा आणि विविधतेचा उत्सव आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, पर्यावरणाच्यादृष्टीने आणि मुख्यतः आर्थिकदृष्टीने हा सण महत्त्वाचा समजला जातो.
१ सामाजिक महत्त्व
गणेश चतुर्थी ही काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस अशाप्रकारे साजरी केली जाते. संपूर्ण भारतामध्ये, त्याचप्रमाणे परदेशातही ज्या ठिकाणी भारतीय राहतात त्याठिकाणी मोठ्या आवडीने हा सण साजरा केला जातो. सामाजिक एकोपा राहण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व घरांमध्ये आणि त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. हा गणेशोत्सव भाद्रपद महिन्यामध्ये दरवर्षी साजरा केला जातो.
त्यासाठी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी गणेश मंडळांची स्थापना केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये देखील दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणेशाची पूजा आणि आरती केली जाते. तसेच नैवेद्य दाखवून प्रसादाचे देखील वाटप करण्यात येते. या उत्सव प्रसंगी अनेक गणेश मंडळामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. तसेच या सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली पहावयास मिळते. या निमित्ताने समाजातील लोक एकत्र येतात आणि आपल्यातील मतभेद दूर करून हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.
२ सांस्कृतिक महत्त्व
आपला भारत देश हा संस्कृती धार्मिक परंपरा जपणारा देश आहे. या देशांमध्ये साजरे होणारे प्रत्येक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि एकत्र येऊन साजरे केले जातात. गणेश चतुर्थी हा भारतातील एक महत्त्वाचा असा सण आहे, जो विविधता आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतिनिधित्व करतो. संपूर्ण देशभरात विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. या उत्सवामुळे लोकांना एकत्र येण्यासाठी, त्याचप्रमाणे परंपरा साजरी करण्यासाठी, तसेच सांस्कृतिक पद्धत अवलंबण्यासाठी एक व्यासपीठ मिळते.
३ पर्यावरणाचे महत्त्व
या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्ये करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या पदार्थांचा वापर करून गणपतीच्या मूर्ती केल्या जातात. यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम घडून येत आहे. याला आळा घालण्यासाठी, पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन तसेच पर्यावरण पूरक उत्सवांना चालना देण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे नैसर्गिक साहित्यापासून म्हणजेच माती, कागद यापासून बनवलेल्या गणेशाच्या मूर्ती उदयास येत आहे. यामुळे या मूर्तींचे पाण्यामध्ये विघटन होऊन पर्यावरणातील कुठल्याही जीवांना हानी होत नाही.
४ आर्थिक महत्त्व
गणेशोत्सवाला ज्याप्रमाणे संस्कृती, सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे. हा सण साजरा करण्यासाठी सणाला लागणाऱ्या सजावटीच्या, मिठाईच्या तसेच खाण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोक बाजारपेठेमध्ये येत असतात. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. येथील कारागीर, सजावटकार, व्यापारी लोकांना यामुळे रोजगार निर्माण होतो.
५ गणेश चतुर्थीचे महत्त्व
पुराण कथेनुसार माता-पार्वतीचा पुत्र भगवान गणेश याचा जन्म भाद्रपद चतुर्थीला झाला होता. म्हणून आपण गणेश चतुर्थी हा सण साजरा करतो. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती बुद्धीची देवता आहे. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान असतो. कोणत्याही कार्य असल्यावर सर्वात आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. संकटाचा नाश करणारा, अडथळे दूर करणारा आणि आनंदी वातावरण निर्माण करणारा असा हा विघ्नहर्ता, गणपती म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते.





