परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ताफ्यात दोन बुलेटप्रूफ वाहने दाखल

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या ताफ्यात दोन नवीन बुलेटप्रूफ वाहने समाविष्ट करून सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कूटनीतिक पावले उचलली आणि दोन्ही देशांदरम्यान सैन्य संघर्ष झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
जयशंकर हे पाकिस्तानसंदर्भातील परराष्ट्र मंत्रालयाच्या कूटनीतिक कारवायांचे नेतृत्व करत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत ते विविध देशांच्या नेत्यांशी आणि परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करत आहेत.
हेही वाचा – PCMC : शत्रुघ्न काटे यांची भाजपा शहराध्यक्षपदी नियुक्तीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत!
‘पीटीआय’शी बोलताना सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी अलीकडेच जयशंकर यांच्या सशस्त्र सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यांच्या ‘झेड’ श्रेणीच्या काफिल्यात बुलेटप्रूफ वाहने जोडण्याची शिफारस केली. सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन दोन नवीन बुलेटप्रूफ वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२३ मध्ये धोक्याच्या शक्यतेची माहिती आणि आढाव्यानंतर जयशंकर यांची ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा वाढवून ‘झेड’ श्रेणीत आणली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा शाखेकडून त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरवली जाते.