रक्षक चौक येथील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध
महापालिकेचे आवाहन : वाहनचालकांनो वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक उपलब्ध असून या प्रकल्पाचे सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा तपासणी करण्यात आली आहे. तसेच वाहतूक सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी वाहतूक मंत्रालय तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या मान्यताप्राप्त सुरक्षा लेखापरीक्षण सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली होती.
याशिवाय, सल्लागार संस्थेकडून कामाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण आणि सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या अहवालानुसार भुयारी मार्ग आणि त्यास जोडलेल्या रॅम्पच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच भुयारी मार्ग आणि त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतार रस्त्यांवर वाहनांना एकमेकांना ओलांडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच इंडियन रोड काँग्रेस (आय.आर.सी) च्या मानकांनुसार सुरक्षित वेगमर्यादा दर्शविणारे ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादेचे अनिवार्य फलक योग्य ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
भुयारी मार्ग व त्याच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पवर संथ गतीने चालणारी वाहने, सायकलस्वार आणि पादचारी यांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला असून त्यांच्यासाठी स्वतंत्र समतल सेवा रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सदर मार्ग हा केवळ मोटार वाहनांच्या वाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच बस जलद वाहतूक व्यवस्थेसाठी ताशी ३० किलोमीटर सुरक्षित वेगमर्यादेसह स्वतंत्र मार्गिका निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा
पिंपळे सौदागर येथील योगा पार्कच्या कामांना गती!
उताराच्या रस्त्यांवर वेग नियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी भारतीय मानांकनानुसार आडव्या पट्ट्यांचे चिन्हांकन करण्यात आले आहे. तसेच वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी मार्ग एकत्र येणाऱ्या आणि विभाजित होणाऱ्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे पिवळे दिवे बसविण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे वाहनचालकांना वेग कमी करण्याचा इशारा मिळून अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविण्यासाठी संरक्षक कठड्यांवर मध्यदर्शक बसविण्यात आले आहेत. या मध्यदर्शकांवर भारतीय मानांकनानुसार पिवळ्या रंगाची प्रकाश परावर्तित करणारी पट्टी बसविण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण पुलावर ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा दर्शविणारे वाहतूक नियंत्रण फलक लावण्यात आले आहेत, अशी माहिती स्थापत्य प्रकल्प विभागाकडून देण्यात आली आहे.
सांगवी-किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या दोन्ही रॅम्पसंदर्भातील सुरक्षा तपासणीतील सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या मार्गावर ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादेचे पालन करावे तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
सांगवी-किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले असून सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन अडथळाविरहीत प्रवासासाठी हा भुयारी मार्ग सोयीचा ठरणार आहे. नागरिकांनी वेगमर्यादा आणि वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. तसेच बीआरटीएस मार्गिकांमध्ये खासगी चारचाकी, दुचाकी वाहनांनी प्रवेश करू नये व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
– कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.





