PCMC : शत्रुघ्न काटे यांची भाजपा शहराध्यक्षपदी नियुक्तीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत!
RSS प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे : संघटनाबळकटीसह संघ-भाजप यांचा समन्वय अधिक दृढ होईल

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड भाजपाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पिंपरी चिंचवड येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी अखंड भारत मातेच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार अर्पण केला आणि संघाच्या विचारसरणीला साष्टांग नमस्कार अर्पित केला. यापूर्वी त्यांनी पक्ष संघटनेमध्ये कार्याध्यपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
RSS कडून औपचारिक स्वागत आणि सत्कार
या भेटी दरम्यान RSS चे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे व जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी शत्रुघ्न काटे यांचा पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार केला. यावेळी संघ समन्वय समितीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतप्रसंगी हेमंतराव हरहरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही निवड योग्य व वेळेवर झालेली असून, त्यामुळे पक्ष संघटनाबळकटीच्या दिशेने अधिक सक्षमपणे वाटचाल करेल.”
संघटनात नवचैतन्य निर्माण होणार – नरेंद्र पेंडसे
नरेंद्र पेंडसे यांनीही आपल्या भाषणात शत्रुघ्न काटे यांचे कौतुक करताना सांगितले, “त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा निर्माण होईल आणि संघ-भाजप यांचा समन्वय अधिक दृढ होईल.” त्यांनी ही निवड संघविचारांचा आदर करणाऱ्या नेतृत्वाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचेही नमूद केले.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानीत रंगणार महाकाव्यसंमेलनाचा सोहळा
भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
शत्रुघ्न काटे यांच्या शहराध्यक्षपदी झालेल्या निवडीचे भाजपचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व समर्थकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. ही निवड कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून, यामुळे पक्षाच्या कार्याला आगामी काळात अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात कट्टर संघविचारसरणीचे आणि प्रभावी स्थानिक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या शत्रुघ्न काटे यांची ही नियुक्ती भाजपच्या आगामी राजकीय रणनीतीत निर्णायक ठरणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.