Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पेरणीची घाई नको ! कृषी खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन; तूर्त पाऊस अपेक्षित नसल्याचा दिला इशारा 

Agriculture News :  मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास थांबला आहे. ही स्थिती 14 जूनपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीची कोणतीही घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी खात्याने केले आहे.

मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे यंदा वेळेवर पेरण्या होतील असा दावा केला जात होता. पण त्यानंतर पावसाने अचानक ओढ दिली. यामुळे शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेत. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी कोणतीही घाई न करण्याचे आवाहन केले आहे.

कृषी खात्याच्या माहितीनुसार, मागील जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे थांबल्यासारखा झाला आहे. किमान 14 जूनपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान खात्याने 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंश तसेच त्यापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – ‘शासकीय अधिकाऱ्यावर गाडी घातल्यास मोक्का लावणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे. 14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपारनंतर आणि मेघ गर्जनेसह काही भागातच पडेल.

याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button