सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत पवार, शिंदे, फडणवीसांचं नाव पुसलं जाणार नाही; सुनील तटकरे यांनी उधळली स्तुतीसुमने

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असून रायगड पालकमंत्री पदावरुन महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका भाषणात तटकरेंनी भरत गोगावलेंची नक्कल करत मिश्कील टोला लगावला होता. तर, आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून थेट नाव घेत सुनिल तटकरेंवर टीका करण्यात आली होती. मात्र, आज माणगाव येथील एका कार्यक्रमासाठी हे दोन्ही तटकरे व गोगावले एकाच व्यासपीठावर दिसून आले. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची नावं पुसता येणार नाहीत, अशी स्तुतीसुमने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव मधील एका कार्यक्रमात केली. यावेळी व्यासपीठावर सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी सुद्धा उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईचे नाव देण्यात आलेल्या एका सीबीएसई शाळेच्या उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात बोलताना सुनिल तटकरे यांनी महायुतीमधील प्रमुख पक्षाच्या तिन्ही नेत्यांचं तोंड भरुन कौतुक केलं. सत्ता येत असते जात असते, परंतु मिळालेल्या सत्तेचा उपभोग घेत असताना ती कामं करण्यासाठी आहे. त्याच्यासाठी सत्तेच मूल्यमापन करायचं असतं ही भावना आपण अवलोकन करावी, असे तटकरे यांनी म्हटले. तटकरे यांनी नाव न घेता व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनाच हा टोला लगावल्याची चर्चा या कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळा रंगली आहे.
हेही वाचा – पेरणीची घाई नको ! कृषी खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन; तूर्त पाऊस अपेक्षित नसल्याचा दिला इशारा
माणगावमध्ये पहिल्यांदाच सीबीएससी शाळेचे उद्घाटन करण्यात आलं असून शिक्षण समाजासाठी महत्वाचे आहे. जगाच्या स्पर्धात्मक युगात अशा शाळा पाहिजे. या शाळेला माझ्या मातोश्रींचे नाव दिल्यामुळे शाळा व्यवस्थापक आणि संस्थापक यांचे मी आभार मानतो. अशा क्षणी आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी याप्रसंगी म्हटले. श्रीकांत शिंदेला त्याच्या आईने डॉक्टर केलं, पण मी 12 वी मधून मागे गेलो. मात्र, आम्ही गुवाहाटीची परीक्षा पास झालो, असा मिश्कील टोलाही शिंदेंनी लगावला. श्रीकांत शिंदे यांना मी डॉक्टर केलं, श्रीकांत आज 4 देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याचा काम नरेंद्र मोदी यांनी चोखपणे केलं. आपल्याकडे आता पाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीत. आपल्या देशाने आतंकवादी हड्डे उध्वस्त केले, पाकिस्तानमधील सर्वसामान्य माणसांना मारले नाही. याप्रसंगी, देशाने लष्कराच्या बाजुने उभे राहिले पाहिजे, असेही एकनाथ शिंदंनी म्हटलं.





