कोकण किनारपट्टीवर ढगांची दाटी! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather | तीव्र उष्णतेने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारा मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून, आता त्याचा उत्तर दिशेकडील प्रवास वेगाने सुरू झाला आहे. सॅटेलाइट (उपग्रह) चित्रांनुसार, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर शुक्रवारी दाट ढगांची दाटी दिसून येत असून, ढगांचा हा पट्टा आता थेट तळकोकणाच्या वेशीवर पोहोचला आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचे अधिकृत आगमन होईल, अशी दाट शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अरबी समुद्रात अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सॅटेलाइट प्रतिमांमध्ये केरळ, कर्नाटक आणि गोव्याची संपूर्ण किनारपट्टी दाट ढगांनी व्यापलेली दिसत आहे. हा ढगांचा पट्टा हळूहळू तळकोकणाच्या दिशेने सरकत आहे. पुढील ४८ तासांत हीच स्थिती कायम राहिली, तर तळकोकणात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
हेही वाचा
ओला कचरा संदर्भात पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा..!
७ किंवा ८ जून रोजी महाराष्ट्रात एन्ट्री शक्य
पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती उत्तम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवार ७ जून किंवा सोमवार ८ जून रोजी मान्सून राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर (तळकोकण) दाखल होऊ शकतो. मात्र, समुद्रातील वातावरण असेच अनुकूल राहिल्यास या ठरलेल्या अंदाजाच्या एक दिवस आधीच मान्सून गोव्यासह तळकोकणात धडकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
राज्यात आज ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’
अंदमानमध्ये १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल सुरुवातीला संथ गतीने सुरू होती, ज्यामुळे त्याच्या केरळमधील आगमनाला ३ दिवस उशीर झाला. मात्र, आता मोसमी वाऱ्यांनी वेग घेतला असून आग्नेय बंगालचा उपसागर, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, कोमोरिनचा उर्वरित भाग, केरळ आणि अरबी समुद्राचा मोठा हिस्सा व्यापला आहे.
मान्सून दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ तर काही संवेदनशील भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता थेट कोकण किनारपट्टीकडे लागले आहे.





