ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वापरात नसलेल्या वस्तू जवळच्या आर.आर.आर. केंद्रात जमा करून पुनर्वापराला चालना द्या

स्वच्छ, हरित शहरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पिंपरी | प्रत्येक घरात वेळोवेळी साफसफाई करताना जुनी खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर अशा अनेक वस्तू बाहेर टाकल्या जातात. या वस्तू रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने शहराचे सौंदर्य बाधित होते आणि कचऱ्याचे प्रमाण वाढते. मात्र, या वस्तू योग्य पद्धतीने संकलित करून गरजूंपर्यंत पोहोचवल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन समाजालाही मदत होते. सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील विविध प्रभाग स्तरावर आर.आर.आर. (रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्रे सुरू केली आहेत. तरी नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रात जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाकडून शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत विविध ठिकाणी आर.आर.आर. केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये नागरिकांनी घरातील न वापरता ठेवलेल्या पण चांगल्या स्थितीतील वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या वस्तूंचा गरजूंपर्यंत पुनर्वितरण केले जाते. त्यामुळे शहर स्वच्छ राहते, कचऱ्याचे प्रमाण घटते आणि समाजात पुनर्वापराची जाणीव वाढते.

या उपक्रमामुळे वापरात नसलेल्या वस्तूंचा योग्य पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीद्वारे पर्यावरणावर होणारा ताणही घटतो. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधला जात आहे.

आपण आर.आर.आर केंद्रात या वस्तू जमा करू शकता

पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, चांगल्या स्थितीतील कपडे, चादरी, पडदे, खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या इतर वस्तू.

हेही वाचा           :              T20 WC 2026 सेमीफायनलचं चित्र स्पष्ट; इंग्लंड व दक्षिण आफ्रिका अव्वल, उर्वरित दोन संघांवर नजर 

या ठिकाणी आहेत आर.आर.आर केंद्र :

“अ” क्षेत्रीय कार्यालय : कापसे उद्यान, मोरवाडी (प्र. १०), आकुर्डी भाजी मंडई (प्र. १४), संत तुकाराम महाराज गार्डन (प्र. १५), श्रीधरनगर गार्डन (प्र. १९)

“ब” क्षेत्रीय कार्यालय : एसकेएफ कंपनी शेजारी, थेरगाव (प्र. १७), हेगडेवार पूल, दर्शननगरी (प्र. १८), धर्मराज चौक, रावेत (प्र. १६), ज्योतिबा उद्यान, काळेवाडी (प्र. २२)

“क” क्षेत्रीय कार्यालय : हेगडेवार क्रीडा संकुल, अजमेरा (प्र. ९), धावडे वस्ती, भोसरी (प्र. ६), संत सावता महाराज उद्यान, मोशी (प्र. २), संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, पिंपळे गुरव (प्र. ८)

“ड” क्षेत्रीय कार्यालय :लिनियर गार्डन, कोकणे चौक (प्र. २८), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख (प्र. २६), तानाजी कलाटे उद्यान, वाकड (प्र. २५), प्रभाग कार्यालय क्र. २९

“इ” क्षेत्रीय कार्यालय : मोशी चौक (प्र. ३), दिघी जकात नाका (प्र. ४), राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी (प्र. ५, ७)

“फ” क्षेत्रीय कार्यालय : वृंदावन, चिखली (प्र. १), भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (प्र. ११), रूपीनगर पोलिस चौकी (प्र. १२), शनि मंदिर, सेक्टर २१ (प्र. १३)

“ग” क्षेत्रीय कार्यालय : थेरगाव हॉस्पिटल शेजारी, जगताप नगर (प्र. २३), मोरू बारणे उद्यान, थेरगाव (प्र. २४), पिंपरीगाव बसस्टॉप (प्र. २१), आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण (प्र. २७)

“ह” क्षेत्रीय कार्यालय : छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर (प्र. २०), सितांगण गार्डन (प्र. ३०), कै. काळुराम जगताप तलाव (प्र. ३१), जुनी सांगवी भाजी मंडई (प्र. ३२).

स्वच्छ आणि हरित शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. घरातील वापरात नसलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रात जमा करून नागरिकांनी पर्यावरण संवर्धना सोबतच गरजू बांधवांना मदतीचा हात द्यावा. महापालिकेकडून राबविण्यात येणारा आर.आर.आर केंद्र हा उपक्रम सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबविण्यात येणारा आर.आर.आर. केंद्र हा उपक्रम स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांना जोडणारा आहे. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करावे.

– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button