#CoronaVirus: HDFC आणि ICICI बॅंकेने केले ‘हे’ मोठे बदल

देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठी पावलं उचलण्यात आली आहे. देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. परंतु त्यातून बँकींकसह काही क्षेत्रांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बँकांनीही खबरदारी घेत आपल्या कामकाजात काही मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत. खासगी क्षेत्रातील दिग्गज बँका HDFC आणि ICICI बँकेनं काही बदल केल्याची सोमवारी सूचना दिली. ग्राहकांनी जास्तीत जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शनचा वापर करावा, असं आवाहन बँकांकडून करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून या बँकांनी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे.
एचडीएफसी बँकेनं आपल्या कामकाजाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही बँक कार्यरत राहणार आहे. तसंच परदेशी चलन बदलणं आणि पासबुक अपडेटसारख्या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. रविवारी बँकेनं ग्राहकांना यासंबंधी सुचनादेखील पाठवल्या आहेत.





