विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे निधन झाले आहे. मुंबईहून बारामती येथे प्रचारादरम्यान जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ पसरली असून शोक व्यक्त केला जात आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला असून महाराष्ट्रात तीन दिवस राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बुधवारी आपल्या कार्यालयांसाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. यावेळी केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा सुरु राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) नेत्याच्या निधनानंतर मुंबई विद्यापीठानेही परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. परीक्षा पुढे ढकलल्या असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
हेही वाचा – यशवंतरावांचे स्मृतीस्थळअन् कराडशी ॠणानुबंध; अजित पवारांचा यशवंतरावांना श्रद्धांजलीचा शिरस्ता
दरम्यान, परीक्षा विभागाने जाहीर केले आहे की, २८ जानेवारी, २०२६ रोजी नियोजित असलेल्या सर्व दुपारच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पुणे येथे अजित पवार यांच्या निधनानंतर वाणिज्य आणि व्यवस्थापन, कला आणि शिक्षण, तसेच सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (CDOE) च्या संलग्न महाविद्यालयांना हा निर्णय लागू होईल. तर सुधारित परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. महाविद्यालयीन प्राचार्यांना विद्यार्थ्यांना त्यानुसार माहिती देण्यास सांगितले आहे.
दुखवटा आणि कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयाने जारी केले आहेत. आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यासह राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण राज्यात त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल दुःख आणि शोक व्यक्त केला.




