Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अर्थसंकल्प कोण सादर करणार? अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सरकार समोर प्रश्नचिन्ह

मुंबई : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थ खाते हे अतिशय महत्त्वाचे खाते असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) ज्येष्ठ मंत्र्याला दिले जाऊ शकते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते तूर्तास आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता अधिक आहे.

राज्यातील सत्तावाटपात अर्थ हे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आणि अर्थमंत्रीपदाचा मोठा अनुभव असलेले व अर्थविषयक दांडगा अभ्यास असलेले अजित पवार यांनी हे खाते भूषविले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी ते अनेक वर्षे भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मंत्र्यांमध्ये अर्थ खात्याचा अनुभव व अभ्यास असलेले मंत्री नाहीत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ मंत्री आहेत. अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवण्याचा निर्णय झाला, तर त्याचा कार्यभार त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकर्‍यांना मोफत वीज यांसह अनेक लोकप्रिय योजनांवर आणि पायाभूत सुविधा व अन्य प्रकल्पांवर मोठा खर्च होत आहे. शेतकरी कर्जमाफी करण्यासंदर्भातील निर्णय जूनपर्यंत घेतला जाईल, असे फडणवीस यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या वेळी जाहीर केले आहे. आर्थिक आव्हाने मोठी असून अर्थ खात्याचा दांडगा अनुभव असलेल्या नेत्याकडेच हे खाते दिले जाईल. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अर्थसंकल्पापूर्वी दीड-दोन महिने आधी विविध खात्यांच्या अधिकारी व मंत्र्यांबरोबर बैठका घेतल्या जातात. उद्योजक, व्यापारी असोसिएशन, संघटना आदी विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींशी चर्चा होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असल्याने हे काम पार पाडण्यासाठी अनुभवी मंत्र्यांची गरज भासणार आहे.

फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना अर्थ खाते त्यांच्याकडे होते आणि त्यांचा या खात्याचा चांगला अभ्यासही आहे. अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास सुरुवातीला भाजपचा मोठा विरोधही होता. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आले असल्याने या खात्याचा कार्यभार तूर्तास फडणवीस हे आपल्याकडे ठेवण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या इमारतीवरील तिरंगा ध्वजस्तंभाच्या मध्यावर आणला गेला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button